साळ नदीचे अस्तित्व टिकवण्यासाठी उपाययोजना आवश्यक

साळ नदी सध्या प्रदूषणाने ग्रासलेली; नदीचे अस्तित्व टिकवण्याची ही शेवटची संधी

अजय लाड | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः दक्षिण गोव्यातील सासष्टीसाठी एकेकाळी जीवनदायिनी समजली जाणारी साळ नदी सध्या प्रदूषणाने ग्रासलेली आहे. नदी संवर्धनासाठी आवश्यक ती पावले वेळीच न उचलल्यास नदीच धोक्यात आलेली असून नदीचे अस्तित्व टिकवण्याची ही शेवटची संधी आहे. दिवसेंदिवस प्रदूषित होत चालली आहे, मात्र वेळ न दवडता प्रशासन तसेच लोकांनीही याविषयी वेळीच गंभीर दखल घेतल्यास ही जीवनदायिनी पुन्हा जिवंतपणे आपल्या पारदर्शक सळसळत्या लाटासह वाहणे अशक्य नाही, फक्त इच्छाशक्ती जबर हवी. सध्याच्या काळात नदी साफ करण्याबरोबरच सभोवतालच्या विविध घटकाद्वारे थेट नदीत येणाऱ्या बाबीवरही रोख लावणे तितकेच गरजेचे व आवश्यक बनलेले आहे.             

२००८ पासून साळ नदीच्या अस्तित्वासाठीचा लढा सुरू झाला. यासाठी बाणावली ग्रामस्थ सर्वप्रथम पुढे आले होते. कार्मोणा ग्रामस्थानीही एकेकाळी नदीच्या प्रवाहात वाढणाऱ्या प्रदूषणाची दखल घेण्यासाठी, शिवाय नदी शेजारी येणाऱ्या मेगा हाऊसिंग प्रकल्पावर रोख लावण्यासाठी ग्रीनपीस याचिकाही दाखल केली होती. परंतु दिवसेंदिवस नदीत वाढणाऱ्या प्रदूषणाची पातळी पाहिल्यास कुठल्याच प्रकारच्या सुधारणा झालेल्या दिसून येत नाही. सासष्टीच्या साळ नदीच्या कुंकळ्ळी आणि नावेली या प्रमुख उपनद्या आहेत. या नद्यांच्या काठांवर मोठमोठया वस्ती, गृहप्रकल्प, वसाहती आहेत. यातील बहुतांशी घरांचे सांडपाणी व इतर कचरा टाकला जातो. जीवनदायिनीची ही अवस्था  प्रशासनाची नजर चुकवून केली जात आहे. नदीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित बाबीवर रोख लावणे गरजेचे असल्याचे पर्यावरणप्रेमींची कळकळीची मागणी आहे. ओर्ली, वार्का इत्यादी ठिकाणचे काही भाग सोडल्यास शहराच्या लगत येणाऱ्या बाणावली, खारेबांद, नावेली आदी वस्तीच्या भागांत ही नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेली असून काही ठिकाणी नदी बांधकामांसाठी बुजवण्यात आलेली आहे. सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमीनी वेळोवेळी अशा बाबी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत, मात्र यावर कायमचा तोडगा न काढता ही प्रकरणे सर्रासपणे दाबली जातात, ही शोकांतिका आहे. 

डोंगर कड्याकपारीतून येणारे पावसाचे खळळते पाणी शहराच्या नाल्यातील घाणीसह नदीत येते, शहरात अजून मलनिस्सारण समस्येवर कायमचे निवारण नाही, परिणामी शहरांतील घाण सर्रास नाल्यात सोडण्यात येते. शहरात बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या आस्थापनाशेजारून नाक न मुरडता जाणे शक्य नाही. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्लांट नसल्याने अस्थापनातील सर्व प्रकारची घाण नाल्यात सोडण्यात येते. ऐन पावसाळ्यात ही घाण या नाल्यातून खळखळत्या पाण्यासह नदीत गेल्यास आश्चर्य नाही. मुळात आपली घाण नाल्यात सोडणाऱ्यावरच कारवाई होणे आवश्यक असून ग्रामपंचायत पालिकांनी याप्रकरणी कठोर भूमिका घेतल्यास यात सुधारणा होणे शक्य आहे. 

लोकसंख्या वाढली, प्रदूषण वाढले तरीही सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात मुबलक एसटीपी प्रकल्प नाहीत. इच्छाशक्ती अभावी प्रशासनाने याप्रश्नी चुप्पी साधली आहे. २०१८ मध्ये केंद्राद्वारेही साळ नदीच्या वाढत्या प्रदूषणाची दखल घेऊन निधी जारी केल्याचे समजते, मात्र सरकार दरबारी याची काही नोंद नाही. सध्या साळ नदीतील गाळ उपसण्यासाठी दोन टप्प्यात काम सुरू असून आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. यासाठी १६ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती जलसंसाधन विभागाद्वारे मिळाली. सरकारद्वारे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत असले तरी पर्यावरणप्रेमींना साळ नदीबाबत समाधान नाही, परिणामी नदिसंबंधी अनेक याचिका आजही हरित लवादामध्ये सुनावणीस येत असतात. सुमारे ४० किलोमीटर पर्यत ही नदी फोफावली असल्याने वरवर नदी साफ वाटली तरी विविध ठिकाणी विविध प्रकारे नदीच्या पात्राची होणारी हानी डोळ्याआड करण्यासारखी नाही.            

साळ नदीतील गाळ उपसण्याचे काम दोन टप्प्यात सुरू असून एका टप्प्याच्या कामासाठी १६ कोटी रुपये खर्च आखण्यात आला आहे. पैकी ८० टक्के काम पूर्ण झाले असून २० टक्के काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्यासाठी निधीची छाननी प्रक्रिया सुरू आहे. जलसंसाधन विभागाद्वारे हा प्रकल्प हाती घेण्यात आलेला असून जेव्हा जेव्हा लोकाद्वारे थेट नदीत सांडपाणी सोडण्यात येत असल्याच्या तक्रारी येतात तेव्हा त्या त्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येते. साळ नदीचे पाणी पिण्याइतपत स्वच्छ होत नसल्यास अंघोळीसाठी वापरता येईल, तेवढे तरी साफ करण्याचा जलसंसाधन खात्याचा उद्देश असल्याचे खात्याकडून सांगितले गेले. साळ नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी अनेकवेळा सामाजिक कार्यकर्त्याद्वारे आवाज उठविण्यात आला आहे. सर्वात आधी शहरातील घाण नदीत जाण्यावर रोख लावणे आवश्यक आहे. लाखो करोडो रुपये खर्च करून वर्षानुवर्षे नदी साफ करण्यात येते, परंतु ज्यामुळे नदी प्रदूषित होते, त्या कारणावर रोख लावण्यावर ठोस कृती होत नाही. परिणामी काहीवेळा मलनिस्सारण वाहिनी फुटल्यास सर्व घाण पाणी थेट साळ नदीत जाते.             

सौजन्यः गोवन वार्ता 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!