मैत्रीशिवाय जीवनाला संपन्नताच येत नाही…

मैत्री दिनानिमित्त खास विचारमंथन...

Goan Varta Live | प्रतिनिधी

आज आंतरराष्ट्रीय मैत्री दिन. त्यानिमित्त सर्व मित्रमंडळीना मनःपूर्वक शुभेच्छा. मैत्री हा एक अनमोल दागिना. जन्मापासून ते मरणापर्यंत बाळगण्याचा व मिरवण्याचादेखील. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री. नड्डाजी यांच्या गोवा भेटीच्यावेळी त्यांनी मंगेशीला भेट दिली. देवळाच्या प्रवेशदारातच एक मिलिटरी अधिकारी श्रीपादभाऊ नाईकांबरोबर समोर आला. तो होता त्यांचा वर्गमित्र. काही वर्षांनी दोघे भेटत होते. बोलणे झाले व दोघांनी एकमेकाला आपले मोबाईल नंबर दिला व पुढील कार्यक्रम सुरू झाला. मित्र व मैत्रीचा आपल्या जीवनावर फार मोठा प्रभाव असतो. मैत्रीशिवाय जीवनाला संपन्नताच येत नाही. मित्रच नाही असे सांगणारे व असणारे विरळाच.

एक माणुसघाणी व्यक्ती होती. पण त्या व्यक्तीला एकच जीवश्च कंठश्च मित्र होता. एकदा दोघांतही कडाक्याचे भांडण झाले. आता मैत्री तुटणार तेवढ्यात दुसऱ्याने हसत-हसत त्या माणूसघाण्या व्यक्तीला सांगितले ‘तुझ्या मरणानंतर तुला खांदा द्यायला इतर तीन माणसे आणण्यासाठी मीच धावपळ करणार त्यासाठी तरी मैत्री टिकव.’ वाद तिथेच संपला व मैत्रीही टिकली.

राजकीय मैत्री हा मैत्रीचा तर एक विशेष प्रकार. ही मैत्री कधी व कितीकाळ टिकेल ते सांगता येत नाही. कारण ती सोयीस्कर जास्त व प्रामाणिक कमी असते. म्हणून तर राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो हा वाक्प्रचार आला असावा व त्याची सत्यता तपासण्यासाठी निवडणुक हे तर एक अत्यंत प्रभावी माध्यम. कालपरवा पर्यंतचे मित्र कधी शत्रू झाले व कट्टर हाडवैरी कधी मित्र झाले हे समजणे सुद्धा मुश्किल. आता तर घोडंमैदान जवळच आहे. चांगला मित्र हा व्यवहारातील चांगला भागीदार राहील, असे मात्र फार कमी वेळा दिसून येते.

वकिली क्षेत्रातील एक अनुभव. एकदा एका वकील मित्राने एका केससंदर्भात आपल्या मित्राकडे चर्चा केली. चर्चेदरम्यान स्वाभाविकपणे सर्व बाजूनी चर्चा झाली. दोन दिवसांनी कोर्टात एका केसकरिता दोन्ही मित्र एकमेकांविरुद्ध उभे राहिले. अर्थात राहिले म्हणून त्यात गैर काही नाही. पण केस चालू झाल्यानंतर पहिल्या मित्राच्या लक्षात आले कि ज्या तरतुदीच्या आधारे त्याने केस उभी केली होती त्याची दुसरी बाजू आज प्रतिपक्षाच्या बाजूने उभे असलेला मित्र, त्यांनी चर्चा केलेल्या मुद्याच्याआधारे मांडत होता. केसचा निकाल काय लागायचा तो लागो पण मैत्रीचा निकाल मात्र तिथल्या तिथे लागला. पूर्ण विश्वास हा मैत्रीतील अत्यंत महत्वाचा धागा. नाटके अनेक रंगतात पण मैत्रीचे नाटक मात्र कधी चालत नाही व रंगतही नाही. एक इंग्रजी वाक्य आठवते कि मैत्री ही आरश्यातल्या प्रतिबिंबाप्रमाणे अत्यंत पारदर्शक असावी. मैत्रीचा हा खळाळता झरा नेहमीच निखळ व निर्मळपणे वाहत राहो हीच सदिच्छा !

– एड. नरेंद्र सावईकर– माजी खासदार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!