अरे, हे तर आपल्यातलेच..!

वर्चस्ववादाची प्रवृत्ती सगळीकडे आहे. ती अधोरेखित करण्यात हे चित्रपट यशस्वी झाले आहेत.

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

निसर्गदत्त न्याय्य वागणूक आणि श्रमाचे उचित श्रेय हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार. मग तो सामाजिक जीवनात असेल किंवा आताच्या आधुनिक कॉर्पोरेट क्षेत्रात. पण काही झारीतले शुक्राचार्य त्यात खोडा घालतात. वर्णवर्चस्व आणि सधनांकडून होणारे दमन हा ‘असुरन’ आणि ‘कर्णन’ चित्रपटांचा गाभा असला, तरी समाजव्यवस्थेतील खेकडावृत्तीवर ते भाष्य करतात. त्यामुळे त्रिकालाबाधित परिणाम साधण्यात दिग्दर्शकद्वयी यशस्वी ठरले आहेत. प्रश्न हा आहे की, आपण यातून काय शिकणार..?

एखादा माणूस विद्रोह का करतो, याचे उत्तर शोधायचे असेल, तर ‘असुरन’ आणि ‘कर्णन’ हे तमीळ चित्रपट बघावे लागतील. ज्या मानवी समाजाचा आपण एक घटक आहोत, त्याच समाजाच्या व्यवस्थेने माणूस म्हणून जगण्याचा मूलभूत हक्क हिरावून घेतला. त्या समाजाविरोधात संघर्ष करूनच आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्याची धडपड, धमक हा यातील समान दुवा. पण ही दमनशाही केवळ जातीपुरती मर्यादित आहे का? नाही! वर्चस्ववादाची ही प्रवृत्ती सगळीकडे आहे. ती अधोरेखित करण्यात हे चित्रपट पुरेपूर यशस्वी झाले आहेत.

भाष्य करण्याआधी या चित्रपटांची स्टोरीलाईन पाहू.

‘असुरन’ची निर्मिती 2019 सालची. ‘वेक्काई’ या तमीळ कादंबरीवर आधारित कथानक. सरंजामी, वर्णवर्चस्ववादी मनोवृत्ती वंचित समाजघटकांना कशी हीन वागणूक देते, त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणून प्रगतीचे सगळे मार्ग बंदिस्त करण्याची कारस्थाने कशी रचली जातात आणि विद्रोहाचा प्रत्येक आवाज कसा दाबून टाकला जातो, याची वेगवान आणि प्रभावी मांडणी ‘असुरन’मध्ये करण्यात आली आहे. आपल्या आसुरी लालसेपोटी वंचितांना टाचेखाली चिरडून ठेवण्याचा दांभिकपणा दिग्दर्शक वेत्रीमारन यांनी उत्तमरीत्या उघडा पाडला आहे. अर्थातच याला वर्णवर्चस्ववाद आणि जातीय संघर्षाची किनार आहे. पण त्याही पलीकडे जाऊन पिढ्यानपिढ्या पिचलेल्या वंचितांनी हे भोग आणखी किती काळ सहन करावे, असा खडा सवाल व्यवस्थेला विचारला आहे. सरळमार्गी आयुष्य जगणार्‍या तरुणाला केवळ ठराविक जातीचा आहे आणि स्वाभिमानी आहे म्हणून लक्ष्य केले जाते. त्याचे तारुण्य अक्षरशः उध्वस्त केले जाते. संपूर्ण समाज देशोधडीला लावला जातो. याचा वचपा काढल्यानंतरही परिस्थितीशरण होऊन पुढे तो तरुण वेगळ्या आसमंतात आयुष्याची नव्याने सुरुवात करतो. तिथेही दमनशाही वरचढ ठरते. पाणथळ, कसदार जमीन सिमेंट निर्मिती प्रकल्पाला न दिल्याच्या कारणावरून संघर्ष पेटतो. त्यात नायकाला स्वत:चा एक मुलगा गमवावा लागतो. त्याचा दुसरा मुलगा भावाच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला मारुन मोठा पेच निर्माण करतो. मग बापलेकाचा जिवंत राहण्यासाठी संघर्ष सुरू होतो. त्यानंतर तडजोडी होतात. हॅपी एंडिंग बघायला मिळेल, अशी अपेक्षा असताना पुन्हा वर्णवर्चस्ववादी प्रवृत्ती डोके वर काढते. नायकाच्या सहनशीलतेचा कडेलोट होतो. आयुष्यात फक्त संघर्षच वाट्याला आलेला नायक हिंसेचा आधार घेत यातूनही मार्ग काढतो आणि अखेरीस तुरुंगात जातो.

आता ‘कर्णन’विषयी. कथा 1997 सालमधली. (खरीखुरी घटना 1995 मध्ये घडली होती.) तमिळनाडूमधल्या पोडियंकुलम (गावाचे खरे नाव चित्रपटात बदलले आहे) गावात वंचित समाजाचे लोक राहतात. गावात प्राथमिक सुविधा नाहीत. हा गाव वंचित समाजाचा असल्यामुळे गावाजवळून जाणार्‍या रस्त्यावर बस थांबत नाही. शेजारी मेलूर गावात सधन सवर्ण राहतात. पोडियंकुलमच्या वंचितांना वरचढ ठरू न देण्याच्या इराद्याने मेलूरवासीय पोडियंकुलम गावात बस थांबू देत नाहीत. सगळीकडेच गळचेपी, दबावतंत्र. एक दिवस गावातील एक मुलगी रस्त्यावरच जीव सोडते. तिच्यासाठी एकही गाडी थांबत नाही. यातूनच संघर्षाला चालना मिळते. गावातील युवक कर्णन ही लढाई सुरू करतो. कर्णनच्या मनात समाजातील जातीय चढ-उतारविषयी चीड आहे. मेलूर गावच्या सवर्णांविरोधात कर्णन बंड करतो. पण वर्षानुवर्षे गांजलेल्या ग्रामस्थांमध्ये त्याला साथ देण्याइतके त्राण नसते. गावात बस थांबण्यासाठी तो एकटाच लढा देतो. पोलिस अधिकार्‍याच्या अडेलतट्टू स्वभावाला पायंबद घालण्यासाठी कर्णनची धडपड सुरू होते. गावातल्या लोकांनी आपल्यासमोर डोक्यावरची पगडी उतरवली नाही, म्हणून या पोलिस अधिकार्‍याला संताप येतो. त्यातून कर्णन पोलिस स्टेशनवर हल्लाबोल करतो आणि संकटांना आमंत्रण देतो. पोलिस पोडियंकुलम गावावर हल्ला करतात. तिथून कथा वेगळे वेळण घेते. लष्कर भरतीत रस असणारा कर्णन जेलमध्ये जातो. पण चित्रपटाच्या अखेरीस हॅपी एंडिंग बघायला मिळतं. समाज व्यवस्थेतले हे द्वंद्व स्वत: अनुभवले, तरच अधिक भिडणार हे नक्की!

‘असुरन’ आणि ‘कर्णन’मध्ये अनेक समान दुवे आहेत. त्यातला एक म्हणजे तमीळ पार्श्वभूमी, दुसरा जातीय संघर्ष आणि तिसरा धनुष. ‘सुपरस्टार रजनीकांतचा जावई’ हे बिरुद विसरायला लावणारा कसदार अभिनय धनुषने दोन्ही व्यक्तीरेखा साकारताना केलाय. दोन्ही चित्रपटांतील समान धागा आहे तो संघर्षाचा, आव्हानांचा आणि त्या आव्हानांना पुरुन उरण्याचा. मुळात जो समाज आपल्याला माणूस म्हणून जगण्याचे संकेतच नाकारतो, केवळ विशिष्ट जातीचा-वर्णाचा-वंशाचा-भाषेचा-प्रांताचा आहे, म्हणून मूलभूत घटनादत्त अधिकार मिळण्यात अडथळे आणतो, अशा समाजाला ताळ्यावर आणण्यासाठी बंड पुकारण्याशिवाय पर्याय नाही, असा संदेश हे चित्रपट देतात. कोणतीही कलाकृती ही समाजातील घटनांचा आरसा असते, असे म्हणतात. ‘असुरन’ आणि ‘कर्णन’मध्ये समाजजीवनाचे हेच प्रतिबिंब दिसते. आता कोणी म्हणेल, पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची ही कथा आहे. कोणाचा दावा असेल, हा वर्णवर्चस्ववाद कुठे आहे, दाखवा! दिग्दर्शक वेत्रीमारन आणि मारी सेल्वराज यांना हेच अपेक्षित असावे. अशा वृत्ती अजूनही टिकून आहेत. डोळसपणे समाजात मिसळून, वावरून बघितले, तर सहज दृष्टीस पडतील. आणि तसे अनुभव आलेच नाहीत, तर किमान आजूबाजूच्या परिस्थितीचे अवलोकन करा. वर्ण, जात वगैरे गोष्टी तात्पुरत्या बाजूला ठेवा. आपल्याच खांद्याला खांदा लावून वावरणार्‍या अनेकांच्या करियरचा मागोवा घ्या. तुमच्या आजूबाजूलाच अनेक ‘असुरन’ आणि ‘कर्णन’ दिसून येतील. या कलाकृती घडविण्यामागचा तोच उद्देश आहे. सर्वसामान्य प्रेक्षकाला त्या भिडतात, त्या याच कारणामुळे!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!