काय भुललासी वरलीया रंगा

वरलीया रंगाला न फसता अंतरंगात डोकावून पाहणं गरजेचं

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः वस्त्राचा रंग आणि व्यक्तिमत्व यांचं एक अनामिक नातं आहे. काही व्यक्तिमत्वं ही विशिष्ट रंगात खुलून दिसतात, तर काहींचं व्यक्तिमत्वच असं असतं, की कोणत्याही रंगात ते शोभून दिसतं. निवडणुकांचे ढोल वाजू लागले, की मात्र रंगांनांही महत्व येतं. विशिष्ट वस्तीत किंवा कार्यक्रमाला जाताना विशिष्ट रंगाचा वेष असेल याची काळजी घेतली जाते. कारण त्याचं मतलब मतांकडे जोडलं जातं.

हेही वाचाः SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापासून ते निकालापर्यंत विशिष्ट रंगाचं वस्त्र घातलं, तर यश मिळेल अशीही भावना असते. काहीजण ज्योतिष्याने सांगितलं म्हणून, तर कधी आपल्या अनुभवावरून विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करतात. जसं ‘नावात काय आहे’ असं म्हणणारे आहेत तसं ‘रंगात काय आहे’ असं म्हणणारेदेखील आहेत. ताजं उदाहरण घ्यायचं झाल्यास टोकियो येथे चालू असलेल्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत विश्वाविक्रम करून सुवर्णपदक पटकावणाऱ्या सुमित अंतील या खेळाडूने भागव्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. सध्या चर्चेत असलेले अफगाणिस्तानचे माजी मंत्री सय्यद सादत यांचा सायकल कुरियर म्हणून काम करतानाचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. सदर फोटोत सय्यद हे भगव्या रंगाच्या जाकीटमध्ये दिसतात. याचा बादरायणी संबंध कुणी संस्कृतीशी जोडू नये.

भगव्या रंगाचं आणि भारतीय संस्कृतीचं फार जवळचं नातं आहे. एका अर्थाने भगवा रंग म्हणजेच भारतीय विचार, संस्कृती आणि परंपरा अशी श्रद्धा आहे. गोव्यात जसजसा निवडणूकीचा रंग भरू लागेल तसतसं काही विशिष्ट रंगांचं महत्वही वाढू लागेल. एकेकाळी भगवा आतंकवाद म्हणून आरोळी ठोकणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या वस्त्रातील व्यक्ती आता आपल्या राजकीय सोयीकरीता मात्र त्याच भगव्या रंगाची मखमली वस्त्रं पांघरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करेल. यापासून सावध राहणं गरजेचं आहे.

हेही वाचाः कोलवा समुद्रात 6 मच्छीमारांना जीवदान

संत चोखा मेळा यांनी आपल्या एका अभंगात म्हटलं आहे की:

‘ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ll…’

जरी ऊस वाकडा असला तरी त्याचा रस गोडच असतो म्हणून वरलीया रंगाला न फसता अंतरंगात डोकावून पाहणं गरजेचं आहे.

नरेंद्र सावईकर

हा व्हिडिओ पहाः Crime | Viral Police Rada | निलंबित पोलिसाची लांबलचक फेसबूक पोस्ट

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!