नारळाच्या उत्पादनात गोवा आत्मनिर्भर आहे का ?

नारळाच्या लागवडीपासून वाढीपर्यंत गोव्यातील नैसर्गिक वातावरण नारळाला पोषक असंच आहे.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः आपल्याकडे पुढील ५ वर्षांत नारळ उत्पादनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी कृती आराखडा आणि कार्यक्रम आहे का? आज नारळ बागायतदाराच्या गोदामात नारळ असाच पडून आहे. कृषी पणन मंडळाकडे असलेल्या कुठल्याही यार्डमध्ये नारळाची साठवणूक करण्यासाठी गोवा मुक्तीच्या साठ वर्षांत एकही आदर्श गोदाम नाही आणि पणन मंडळावर असलेल्या बागायतदार प्रतिनिधीची ही प्राथमिकता नाही.

जगात बहुतेक जिथे समुद्र आहे त्या त्या जागी नारळाची लागवड जास्त प्रमाणात केलेली आपल्याला पहायला मिळते. इंडोनेशिया, मलेशिया, ब्राझिल, फिलिपाईन्स, श्रीलंका या देशात मोठ्या प्रमाणात नारळाची लागवड होते. नारळ उत्पादनात जगात भारताचा क्रमांक तिसरा लागतो. भारतात तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांबरोबरच महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, ओरिसा, पच्छिम बंगाल राज्यातही मोठ्या प्रमाणात नारळाची लागवड होते.

हेही वाचाः ड्रग्ज सप्लायचं अंडरवर्ल्ड कनेक्शन ; दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर ‘एनसीबी’च्या ताब्यात !

नारळाच्या लागवडीपासून वाढीपर्यंत गोव्यातील नैसर्गिक वातावरण नारळाला पोषक असंच आहे. गोव्यात समुद्र आहे, मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. पण तरीसुद्धा नारळाच्या राष्ट्रीय उत्पादनात गोव्याचा वाटा अर्ध्या टक्क्याहूनही कमी आहे. गोव्यात वर्षाला साधारण दहा ते बारा कोटी नारळाचे पीक येतं असं सांगण्यात येतं. ही आकडेवारी कशाच्या आधारावर काढण्यात येते याची काही कल्पना नाही. परंतू जर ती खरी असेल तर मागच्या चाळीस वर्षामध्ये त्यात विशेष बदल झालेलाही पाहण्यात आला नाही.

हेही वाचाः मांद्रे मतदारसंघाततर्फे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जींना श्रद्धांजली

ही नारळाची आकडेवारी एकतर कृषी खात्याने नारळ लागवडीखाली असलेल्या जमिनीच्या आधारे किंवा बागायतदारांना दिल्या जाणार्‍या सब्सिडीच्या आधारे ठरवली असावी किंवा गोवा कृषीपणन मंडळाकडे नोंद झालेल्या व्यापार्‍यांकडून खरेदी विक्री केलेल्या नारळांच्या आंकडेवारीवरुन ठरवली गेली असावी.

हेही वाचाः देवगडात गोवा दारूचा सुळसुळाट ; लिकर संघटनेचं पोलिसांना निवेदन

नारळ आणि गोंयकार यांचं एक समिकरण आहे. नारळाशिवाय गोंयकारांचे पानसुद्धा हलत नाही. अगदी माशांच्या हुमणापासून नैवेद्यातल्या पंचखादयापर्यंत आणि गणेशपुजेपासून लग्नकार्यात नवर्‍याच्या हातात दिल्या जाणार्‍या नारळापर्यंत आम्हा गोंयकारांना नारळाची गरज भासते. गोंयकारांच्या घरात दिवसाला दोन तरी नारळ जेवणात वापरले जातात. त्याशिवाय गेल्या दोन दशकांमध्ये गोव्यात वाढीस लागलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे हॉटेल व्यवसायातही वृद्धी झाली आहे. त्यामुळे गोव्याच्या बाजारपेठेत नारळाला कायम चांगलीच मागणी असते.

हेही वाचाः CORONA UPDATE | रुग्ण बरे होण्याचा दर ९६.५० टक्के

इतकी मागणी असूनही गोव्यातील नारळ उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली मात्र दिसत नाही. काय बरे असावी याची कारणे? आमच्या कोकणीत एक म्हण आहे. ‘नाल्लाकारुय रडटा आनी तेलकारुय रडटा’. म्हणजेच नारळाचा व्यवसाय केला तरी खोट येते अन् नारळ विकण्यास परवडत नाही म्हणून तेल काढून विकले तरी नुकसान होते. ही म्हण बहुधा अनुभवानेच रुढ झाली असावी.

हेही वाचाः पीटर आणि त्यांच्या बहिणीची करुण कहाणी…

साधारणपणे सत्तरच्या दशकात नारळाचा भाव नगामागे चार रुपये होता. त्या काळात दिवसाला मजुरी पंधरा ते वीस रुपये असायची. पाडेली, शेतमजूर मुबलक उपलब्ध असायचे. खते, शेती उपकरणे स्वस्त होती. आज हा सगळा खर्च अव्वाच्या सव्वा वाढला आहे. मजूर, पाडेली दामदुप्पट पैसे देऊन इतर राज्यातून आयात करावे लागतात. श्रमजीवी माणसे कमी होत आहेत. कुशल कामगारांची वानवा आहे. गेल्या चाळीस वर्षात महागाई ज्या गतीने वाढली त्या गतीने नारळांचा भाव मात्र वाढला नाही. आज बाजारात तीस ते चाळीस रुपयात नारळ विकत घेताना लोक नाकं मुरडतात. परंतु ज्या बांगड्याचे हुमण नारळाशिवाय होत नाही तो बांगडा किंवा इसवण घेताना मात्र आमच्या मनाला जरासुद्धा हाय होत नाही.

हेही वाचाः अमानुष : विम्याच्या पैशांसाठी आई-वडिलांनीच केला मुलीचा खून

परंतु नारळाला योग्य भाव न मिळणे हेच केवळ उत्पादन कमी होण्याचे एकमेव कारण नाही. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून नारळाच्या बागायतीत ‘एरिओफायड माईट’ रोगाचा शिरकाव झाला. श्रीलंकेत तो साधारण 1997 वर्षी आला. पण गोव्यात 1999 च्या अखेरीस दाखल झालेला हा रोग आजतागायत बागायतदारांना पीडत आहे. हा माईट सहा महिन्यांपर्यंतच्या कोवळ्या नारळांवर हल्ला करतो. हा जिवाणू डोळ्यांना दिसू शकणार नाही इतका लहान असतो. मायक्रोस्कोपनेच पहावा लागेल इतका लहान. परंतु खूप मोठी नाशाडी करतो. माईट लागलेल्या नारळाची पूर्ण वाढ होऊ शकत नाही. नारळातील पाणी हा जीव शोषून घेतो. नारळ आकाराने लहान आणि वेडेवाकडे होतात. अशा नारळांना बाजारात काहीही किंमत नसते. बर्‍याच बागायतीत असे तीस ते चाळीस टक्के नारळ वाया जातात. पीक कमी होण्याचे हेसुद्धा एक प्रमुख कारण आहे.

हेही वाचाः मोरपीर्ला पंचायत क्षेत्रात लसीकरण मोहीम

गेल्या पंचवीस ते तीस वर्षात खूपच कमी प्रमाणात नारळाची नवी लागवड झालेली आपणास पहायला मिळेल. या उलट आगशी, मेरशी, कळंगुट, कोलवासारख्या शहराच्या जवळपास असलेल्या जमिनीला चांगला भाव मिळत असल्यामुळे बर्‍याच वडीलोपार्जित बागायती विकून त्या जागी मोठमोठ्या इमारती उभ्या झालेल्या आपण पहातो. तर सांगे, साकोर्डा, रिवण सारख्या अंतर्भागातील गावातही खाण व्यवसाय बहरू लागल्याने बर्‍याच बागायती मातीच्या ढिगार्‍याखाली गेल्या. सगळ्याच लोकांनी काही केवळ पैशांच्या हव्यासाने बागायती विकल्या नाहीत. काही लोकांनी बागायत व्यवसाय परवडत नसल्यानेच हा टोकाचा निर्णय घेतला.

हेही वाचाः मराठी सण परंपरेत काय आहे वटपौर्णिमेचं महत्व…

कदाचित सरकारी आकडेवारी वेगळी असेल. परंतु एक गोष्ट खरी आहे. कारण काहीही असू द्या, जसजशी वर्षं जातात तसतशी नारळ लागवडी खालील जमीन कमी होत चालली आहे. शहर असू द्या किंवा गाव, गोव्यात जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आजच्या बाजारभावाने जमीन विकत घेऊन नव्या बागायती वसवणे सामान्य शेतकर्‍याला शक्यच नाही. केवळ एखादी मोठी कंपनीच मोठी गुंतवणूक करुन अशा नव्या बागायती वसवू शकतात. किंवा ज्यांच्याकडे वडिलोपार्जित शेतीयोग्य जमीन असेल अशा लोकांनी पुढाकार घेऊन नवीन लागवड केली पाहीजे.

हेही वाचाः कुंकळ्ळीचं राजकारण गलिच्छ पातळीवर

आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नारळाचे जास्त पीक देणार्‍या कितीतरी नवीन जातीचे संशोधन हल्लीच्या काळात झाले आहे. तेव्हा ज्या बागायतींमध्ये खूप जुनी कमी फळे देणारी झाडे असतील त्यांचे सर्वेक्षण करून ती झाडे हटवून त्याजागी नवीन झाडे लावणे हा एक उपाय आहे. फिलिपाइन्स, इंडोनेशिया सारख्या देशात अशा प्रकारे वेळच्यावेळी नवीन लागवड केली जाते. परंतु त्यासाठी केवळ दिखाव्याच्या योजना आणि कागदावरचे कार्यक्रम मात्र चालणार नाहीत, तर शेती खात्याच्या अधिकार्‍यांनी स्वत: बागायतीत बागायतदारांबरोबर राबावं लागेल. तेव्हाच गोवा खर्‍या अर्थाने नारळांच्या बाबतीत आत्मनिर्भर होईल. अन्यथा शेजारील राज्यातून येणार्‍या नारळांवरच गोमंतकीयांना दुपारच्या जेवणातली शीतकडी बनवावी लागेल.

– उदय म्हांबरो

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!