हत्तीमुखी गणपती पूजन परंपरा

केवळ हिंदू धर्मियांतच नव्हे, तर बाैध्द धर्मियांत आणि जैन धर्मियांतही गणेश मूर्ती वंदनीय ठरलेल्या आहेत.

राजेंद्र केरकर | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः हत्ती हा सस्तन प्राणी हजारो वर्षांपासून घनदाट जंगलांची शान असून, भारतीय उपखंडातल्या लोकमानसाने महाकाय देहयष्टी आणि मोठा मेंदू असलेल्या या बुद्धीमान प्राण्याला देवता रूपात पुजले. जेव्हा शेतीचा शोध नवाश्मयुगीन आदिमानवाला लागला तेव्हा तृणभक्षी हत्ती कणसांनी समृद्ध अशा शेतांची नासाडी करायचे आणि त्यांचा उपद्रव होऊ नये म्हणून बहुधा गजमुखी देवतेची पुजा करण्याची परंपरा निर्माण झाली असावी. आज आशिया खंडात भारतीय जंगलांत हत्ती ही वैभवाची खुण ठरली असली तरी आशियाई हत्तींचे अस्तित्व आणि अधिवास संकटग्रस्त आहे ही बाब चिंतेची आहे. आपल्या लोकधर्मात पार्वतीने अंगाच्या मळा पासून एका बालकाची निर्मिती केली आणि त्याची नियुक्ती रक्षणासाठी केली तेव्हा शिवशंभोशी संघर्ष झाला आणि त्यात क्रोधित शंभोने बालकाचा शिरच्छेद केला. पार्वतीचा प्रकोप टाळण्यासाठी शिवगणांनी जंगलात आढळलेल्या हत्तीचे मुख धडापासून वेगळे केले आणि ते बालकाच्या शरीरावर चिकटवले, तेव्हा गजानन देवतेची निर्मिती झाले असे मानले जाते. बालकाचे छोटे शरीर आणि हत्तीचे महाकाय मुख यात भिन्नता असली तरी भारतात अल्पावधीत गजमुखी देवता लोकप्रिय झाली.      

भारतात इसवी सनाच्या सहाव्या व आठव्या शतकातील गणेशमूर्ती बऱ्याच ठिकाणी सापडल्या असून, त्याच्यापूर्वा काळातल्या मूर्ती इसवी सनाच्याच चाैथ्या व पाचव्या शतकांतील अफगाणिस्तानात सापडल्या होत्या. सदर मूर्तीच्या बैठकीवरील कोरीव लेखावरून या मूर्तीची स्थापना शाही वंशातल्या खिंगल राजाने केली होती. चिनी प्रवासी युआनच्यांग जेव्हा इसवी सनाच्या सहाव्या शतकात भारतात येण्यास निघाला तेव्हा वाटेत अफगाणिस्तानातील कपिशा नगरीत वास्तव्यास असताना तिथे हत्तीरूपी देवतेची पूजा होत असल्याचे दृष्टीस पडले होते. पिलूशार नावाने ही देवता ओळखली जात होती. हत्तीरूप देवतेचे गांधार देशातील पिल्लूशार हे नाव आज ही दक्षिण भारतात तमिळ भाषेत पिल्लैयार असे रूढ असून, पुरातत्वशास्त्रज्ञ डाॅ. मधुकर दवळीकर यांच्यामते गणेशपूजेचा उद्गम गांधार देशात झाला होता, इसवी सनाच्या पहिल्या व दुसऱ्या शतकात कुशाण राजवटीतल्या गजमुखी गणेश मूर्ती आढळलेल्या आहेत. पुढे गुप्त राजवटीतही शिवालयात गणेशमूर्ती कोरण्यात आल्या होत्या. इसवी सनाच्या सहाव्या शतकाच्या प्रथमार्धात बाैद्ध धर्मियांनी मध्य आशियात व चीनमध्ये गणेशमूर्तीचा प्रसार केला. एकदंत, सुपासारखे कान असलेल्या, गजमुख, चतुर्भुज, पाश, अंकुश व मोदक धारण करणाऱ्या गणेश मूर्ती भारताच्या विविध भागांत पहायला मिळतात. केवळ हिंदू धर्मियांतच नव्हे तर बाैध्द धर्मियांत आणि जैन धर्मियांतही गणेश मूर्ती वंदनीय ठरलेल्या आहेत. दक्षिण-पूर्वेकडच्या आशियाई देशात गणेश मूर्ती पुजण्याची परंपरा आज ही रूढ असलेली पहायला मिळते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीने ओम नमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या।। म्हणून गणपती समोर ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी नमस्कार करण्यात धन्यता मानलेली आहे. परंतु असे असले तरी वेदाच्या आरंभी गणेशाची पूजा गजमुखी रूपात करण्याची परंपरा रूढ असली पाहिजे.       

सस्तन वर्गातील एक जंगली चतुष्पाद असणारा हत्ती वजनाने पाच ते सहा टन असला तरी त्याचे डोळे बारीक, कान सुपासारखे आणि त्याची श्रवणेंद्रिय आणि घाणेंद्रिय ही अत्यंत तीक्ष्ण असतात आणि त्यामुळे हत्तीविषयीचे आकर्षण मानवी समाजाला सनातन काळापासून आहे. सिंधु संस्कृतीच्या अवशेषांत हत्तीची आकृती कोरलेल्या मुद्रा आढळलेल्या आहेत. वैदिक काळात हत्तींचा उल्लेख आढळतो. ऐरावत हा हत्तींचा जनक मानलेला असून, देव – दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून जी रत्ने लाभली त्यातला एरावत मेघांना आकर्षित करतो आणि त्यामुळे पर्जन्यवृष्टी होत असते असे मानलेले आहे. अष्ट दिग्गज म्हणजे विश्वाचे आधार म्हणूनही हत्तीला पूज्य मानलेले आहे. विजयादशमीला तसेच एखाद्या राज्याचा अभिषेक करताना हत्तींची पुजा केली जाते. नेपाळ देशातले नेवार लोक कार्तिक शुध्द द्वितीयेला गणेशाचे प्रतीक म्हणून हत्तीची कुलदैवत रूपात पुजा करतात. बाैद्ध धर्मियांत हत्तीला गाैतम बुद्धांचे प्रतीक मानलेले आहे. बुद्धाचा जन्म होण्यापूर्वी माता मायादेवी झाेपलेली असताना तिच्या गर्भात श्वेत हत्तीने स्वर्गातून येऊन प्रवेश केला आणि तोच बुद्धाच्या रूपाने अवतीर्ण झाला असे मानले जाते. अजंठा येथील भित्तिचित्रांत बुद्धांचे संपूर्ण जीवन गजरूपात चित्रबद्ध केलेले असून, तेथील नक्षीच्या चित्रकामातही हत्तीच्या सुरेख आकृती पहायला मिळतात. बाैद्ध धर्मीय शिल्पकलेत बाेधिक वृक्षाची पूजा हत्ती करताना चित्रित केलेले आहे. महाबलिपूरम अजंठा, बादामी, सांची, अमरावती, भरहूत, बोधगया येथील शिल्पांत दोन हत्ती लक्ष्मीवर सुवर्णाच्या कलशांतून जलाभिषेक करीत असल्याचे दाखवलेले आहे. गणपती, लक्ष्मी आणि इंद्र या दैवतांचा संबंध हत्तीशी आहे.      

आपल्या देशातील मध्ययुगात जोधपुर, जयपूर, बिकानेर आधी ठिकाणाच्या चित्रकारीमध्ये हत्तींची चित्रे पहायला मिळतात. कुठे युद्ध प्रसंगी, कुठे मृगयेच्या वेळी किंवा मंगलकार्याच्या उत्साहात सामील झालेले हत्ती चित्रबद्ध केलेले असतात. गोवा – कोकणात त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी सोंडेत कलशधारण करून लक्ष्मीच्या दोन्ही बाजूंना उभे असलेले हत्ती जलाभिषेक करत असलेली चित्रित केलेल्या गजलक्ष्मीच्या भव्य अशा पाषाणी मूर्तीची पूजा केळबाय, केलंबिका, गजांतलक्ष्मी काळंबा म्हणून प्रामुख्याने पहायला मिळते. महाराष्ट्रात दोडामार्ग तालुक्यातील हेवाळेच्या अशोकवनात तसेच पाटये गावात महाकाय गजलक्ष्मी पाषणी मूर्ती लक्षवेधक अशाच आहेत. गोव्यात तांबडी सुर्लाच्या जंगलात रगाडो नदीच्या डाव्या किनारी असलेली भव्य अशी गजलक्ष्मीची मूर्ती बाराभूमका म्हणून पुजली जात आहे. हत्तीमुखी गणपतीची भाद्रपदातल्या शुक्ल पक्षातल्या चतुर्थीला होणारी पूजा, सृष्टीतल्या हिरवाईच्या लावण्याविषयीची होणारी पूजा, सृष्टीतल्या हिरवाईच्या लावण्याविषयीची कृतज्ञता आणि उत्कट भक्तीभावाचे प्रकटीकरण आहे. 

सौजन्यः गोवन वार्ता

हा व्हिडिओ पहाः GANESH VISARJAN | गिरीत गणेश विसर्जन स्थळाचं उद्घाटन

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!