गोवेकरांची कळकळीची मागणी!

परमेश्वरा, या बेईमान स्वातंत्र्य-मूल्य द्रोहींना कायमची सद्बुद्धी दे किंवा नामशेष तरी करून टाक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः परमेश्वरा, या बेईमान स्वातंत्र्य-मूल्य द्रोहींना एकतर कायमची सद्बुद्धी दे किंवा नामशेष तरी करून टाकही या 2021च्या अमृतमहोत्सवी गोवा क्रांतीदिनी, गोवेकरांची कळकळीची मागणी! आतापर्यंत 1980 पासून सत्तेवर आलेल्या काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या सत्तांनी आपल्या हीन, स्वातंत्र्यमूल्य-द्रोही कृत्यांनी, गोव्याच्या, पोर्तुगीजपूर्व कालापासून अबाधितपणे चालत आलेल्या भारतीय संस्कृतीशी, सांस्कृतिक मूल्यांशी, ‘देवभूमि,’ ‘पुण्यभूमि,’ ‘दक्षिणकाशी’ या सोज्वळ, आध्यात्मिक प्रतिमेशी अक्षम्य किळसवाणा द्रोह केलेला आहे! ज्या असंख्य सर्वधर्मीय स्वातंत्र्यसैनिकांनी ऐन तारुण्य, संसारसुख, कुटुंब, करियर, सगळंच पणाला लावून, शत्रू पोर्तुगीजांच्या गुलामीतून गोवा मुक्त करण्यासाठी प्रसंगी प्राणांचं बलिदान दिलं, त्या सगळ्यांच्या त्यागाचा आणि स्वातंत्र्यमूल्याकांक्षांचा पार चुराडा आणि घोर अपमान या काँग्रेसी तसंच भाजपाई अशा दोन्ही सत्तांनी केलेला आहे! हे परमेश्वरा, हे भारतमाते, हे क्रांतीदेवते, या असुरांना कदापि क्षमा नको! ते क्षमेस पात्र नाहीतच!

हेही वाचाः KARNATAKA UNLOCK : बेळगावसह 16 जिल्हे सोमवारपासून ‘अनलॉक’

स्वतःलाच एक प्रश्न विचारू, त्याचं प्रामाणिक उत्तर शोधू!

क्रांतीयज्ञात असंख्य स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानानंतर गोवा 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सेनेने मुक्त केला. 450 वर्षांच्या प्रदीर्घ रक्तलांछित ‘पोर्तुगीज-गुलामगिरीतून’ मुक्त केलं!  आपण सगळे स्वतःलाच एक प्रश्न विचारू आणि त्याचं प्रामाणिक उत्तर शोधू! 1980 साली सत्तेत आलेल्या काँग्रेसने आणि त्यानंतर आलेल्या भाजपने खरंच का गोंयकारांना पोर्तुगीजांच्या ‘मानसिक’ गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले? की गोवामुक्तीमागच्या स्वातंत्र्यमूल्यांचा आणि स्वातंत्र्याकांक्षेचाच, सत्तेच्या लालसेपायी पार चुराडा करून टाकला?

हेही वाचाः WORLD YOGA DAY | इतिहास गोवा-योगभूमीचा

गोवामुक्तीच्या साठीनंतर हाती काय पडलं?

गोवामुक्तीच्या साठीनंतर हाती काय पडलं, आणि काँग्रेस-भाजप सत्तांनी वाट कशी लावली, याचा गोषवाराच एकदा मांडूया ना!

हेही वाचाः सरकारी नोकरीः विक्रमाच्या पाठीवरचा वेताळ

भारतीय वारसा (heritage) जपण्याऐवजी, पोर्तुगीज वारसा मात्र प्राणपणाने जपला!

पोर्तुगीजांचा विकृत बीभत्स कार्निवल, भाराभार सरकारी अनुदान देऊन मुक्त गोव्याचा अधिकृत राज्य-उत्सव बनवला! तो गोव्याच्या सर्व तालुक्यात नेऊन पोर्तुगीज स्मृती जागृत ठेवल्या.

दिल्लीला प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सामील होणारे गोव्याचे चित्ररथ पोर्तुगीज मुलामा असलेले (fusion कल्चर) अथवा पाश्चात्य धाटणीचे वाटतील, असे पाठवले!

सगळ्यात जास्त लोकसंख्या, बंदर आणि विमानतळ असलेल्या शहराचे ‘वास्को द गामा’ या समुद्री पोर्तुगीज दरोडेखोराचे ठेवलेले नाव, काँग्रेस आणि भाजपाची केंद्र, राज्य आणि नगरपालिकेत एकाच वेळी, एकाच पक्षाची सत्ता असताना देखील, बदलले नाही!

रस्ते व गावांची पोर्तुगीजांनी ठेवलेली नावे आणि अपभ्रष्ट केलेली स्पेलिंग्स आणि उच्चार जशास तसे ठेवले गेले आहेत.

काँग्रेस राजवटीत पर्यटनाचे निमित्त करून गोव्याची प्रतिमा ‘पूर्वेकडील रोम’ (Rome of the East ) अशी हेतुपुरस्सर करण्यात आली. भाजपाच्या राजवटीत ही प्रतिमा ‘व्यसनभूमि’ अशी करण्यात आली. काँग्रेसने पहिला कॅसिनो गोव्यात आणला! भाजपाने संख्या वाढवून ती सहावर आणली. शिवाय कॅसिनोंना ‘ऑफशोर’ असतानाही मांडवीत कायमचं स्थिर कायदेशीर दर्जा दिला.

गोवा मुक्त झाला तरी मये गावाला मुक्ती मिळालेली नाही. सनदा देण्याच्या नावावर लोकांची फसवणूक चालली आहे. या सनदा तकलुपी असून, कायद्याच्या आधारावर टिकणाऱ्या नाहीत. प्रत्येक निवडणुकीत वचनं आणि घोषणा असतात. प्रश्न अजून सुटलेला नाही!

कुंकळ्ळीच्या पोर्तुगीजांविरुद्धच्या प्रेरक स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची इच्छाशक्तीच सरकारला नाही! फक्त आश्वासने देऊन फसवण्यात येत आहे!

गोवा मुक्ती लढ्याचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यास अक्षम्य दुर्लक्ष्य आणि हेळसांड!

पोर्तुगीजपूर्व गौरवास्पद वारसास्थळे आणि ऐतिहासिक स्थानांना पर्यटनात अजिबात स्थान नाही!

गोव्याच्या पोर्तुगीजपूर्व गौरवशाली इतिहासाचा प्रचार व प्रसार शून्य!

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या फुटिरतावादाची कुणीच गंभीर दखल घेतलेली नाही. उलट सरकार त्यांना चुचकारते आणि संरक्षण देत आहे, हे ध्यानात येते.

गोवा, दमण, दीव स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास या मनोहर हिरबा सरदेसाई लिखित पुस्तकाचे 2 खंड, स्वातंत्र्यसेनानी टी.बी.कुन्हांचे ‘डिनॅशनलायजेशन ऑफ गोवन्स,’ अ.का.प्रियोळकरांचे ‘इन्क्विजिशन ऑफ गोवा’ या महत्त्वाच्या पुस्तकाचं पुनर्मुद्रण आणि ही पुस्तकं सर्व शाळांना पाठवण्याचं सरकार मनावर घेत नाही.

गोव्यातील 51 किल्ल्यांची डागडुजी आणि जतन, त्यांचा संबंध पर्यटनाशी जोडणं, हॉटेल चालवायला विकलेले किल्ले, परत घेऊन त्यांचा सन्मान राखणं एवढ्या वर्षांत जमू नये? खाजगी मालकांना विकलेल्या जमिनीत अंतर्भूत असलेले महत्त्वाचे ऐतिहासिक अवशेष दखल न घेता नामशेष होऊ दिले जात आहेत.

किती गोष्टी सांगायच्या? खुद्द सरकारेच मानसिक गुलामगिरीत आहेत. क्रांतीदिन, मुक्तीदिन फक्त मिरवण्यापुरते आणि नेत्यांनी सलामी घेण्यापुरतेच मर्यादित राहिले!

हेही वाचाः राज्यात व्यसनाधीन होणाऱ्यांची संख्या वाढली!

दैवदुर्विलास! दुसरं काय?   

सार्थ क्रांतीदिन, सार्थ मुक्तीदिन पुढच्या पिढ्यांना तरी पाहता येईल का? 60 वर्षं फुकट तर गेलीच आहेत! सत्तेच्या, लांगुलचालनाच्या पलिकडे जाऊन, राष्ट्रीयतेची जाणीव असली तरच तरणोपाय! स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग आणि दिलेली बलिदाने सत्ताधाऱ्यांनी निष्फळ ठरवलेली आहेत! दैवदुर्विलास! दुसरं काय?     

सुभाष भास्कर वेलिंगकर, पणजी-गोवा
राज्य संघचालक, भारतमाता की जय संघ, गोवा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!