गोंयकार राजकीयदृष्ट्या अत्यंत सूज्ञः अॅड. नरेंद्र सावईकर

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः गेले दोन दिवस ‘थर्ड क्लास’ आणि आज ‘ड्रामा’ या दोन शब्दांमुळे गोव्याचं राजकारण चर्चेत आलं. एका शब्दप्रयोगाचा वापर विधानसभेबाहेर, तर दुसऱ्याचा वापर विधानसभेत करण्यात आला. एकाचा प्रयोग जनतेसमोर, तर दुसऱ्याचा प्रयोग जनतेच्या प्रतिनिधीगृहात. एकाचा प्रयोग ड्रामेबहाद्दरांनी केला, तर दुसऱ्याचा प्रयोग आरोप-प्रत्यारोपा दरम्यान सभागृहात झाला. ‘ड्रामा’ या इंग्रजी शब्दाचा देवनागरी अनुवाद म्हणजे नाटक. कोणत्याही नाटकाचं यश व अपयश हे त्याच्या लिखाणापासून ते सादरीकरणापर्यंत आणि प्रेक्षकांच्या पसंतीवर अवलंबून असतं. कधी नाटक रंगतं, तर कधी त्याचा बेरंग होतो. अर्थात चांगला नाटककार हा चांगला राजकारणी आणि चांगला राजकारणी हा चांगला नाटककार असतो का? होऊ शकतो का? का परिस्थिती त्याला तसा घडवते? या प्रश्नाची उत्तरे ही ज्याची त्याने शोधावीत.
हेही वाचाः चर्च पाडण्यामागे आम आदमीचं सरकार नाही
पण नाटक हा शब्द असंसदीय असल्याचं उपलब्ध माहितीच्या आधारे तरी कुठे आढळून आलं नाही. अर्थात यात दुरुस्ती होऊ शकते. गोवेकर हा तर नाटकप्रिय. शिवाय या क्षेत्रात त्याचं फार मोठं योगदानदेखील आहे हे विस्ताराने सांगण्याची गरजही नाही. या शब्द प्रयोगामुळे अस्वस्थ होण्यासारखं काही नाही. आता ‘थर्ड क्लास’ शब्द प्रयोगाकडे वळूया. पूर्वीच्या काळी रेल्वेमध्ये थर्ड क्लास डबा असायचा. खरं तर ती ब्रिटिशांची देणगी. १९७८ साली तत्कालीन रेल्वेमंत्री स्व. मधू दंडवते यांनी रेल्वेतील हा थर्ड क्लास नामक डबाच काढून टाकला आणि त्यामुळे रेल्वेशी जोडला गेलेला तो शब्दप्रयोग पण.
हेही वाचाः भारतीय निवडणूक आयोगाच्या बैठकीचा अर्थ काय? विधानसभेची निवडणूक लवकर होणार?
आम आदमी या शब्दांचा प्रयोग आपली राजकीय पोळी वापरून घेणाऱ्या ड्रामेबाजांनी मात्र थर्ड क्लास शब्दाच्या केलेल्या प्रयोगामुळे आपली खोटी नियत आणि विकृत मानसिकतेचं दर्शन घडवलं आहे. गोवा आणि गोंयकार हा सुसंकृत आहे. राजकीयदृष्ट्या तो अत्यंत सूज्ञ आहे. खरा ड्रामेबाज किंवा थर्ड क्लास कोण याची त्याला पूर्ण जाणीव आहे. गोवा मुक्तीनंतरच्या सर्व निवडणुकांचा अभ्यास केल्यास हे ध्यानात येईल. नाटक शब्दामुळे अस्वस्थ होणारे थर्डक्लास शब्दप्रयोग करणाऱ्यांच्या पाहुणचार घेऊन आले आहेत. नाटकाला किमान वेळेची तरी मर्यादा असते. पण थर्ड क्लास शब्दप्रयोग करणारी ही न दिसणारी मानसिकता आहे आणि अशा मानसिकतेला ना वेळेची, ना काळाची मर्यादा असते.