गोवा आणि नरेंद्र मोदीजी

नरेंद्र मोदीजी मुळेच गोव्याला नेत्याला मिळालं केंद्रात स्थान

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः १७ सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आपल्या आयुष्याची ७१ वर्षं पूर्ण करून ७२ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्याचबरोबर ७ ऑक्टोबर रोजी त्यांना निवडणूक राजकारणातील २० वर्षं पूर्ण होत आहेत.

१९४७ साली ब्रिटीशांच्या जोखडातून भारत देश स्वतंत्र झाला. नरेंद्र मोदी हे स्वतंत्र भारताचे १४वे आणि स्व. अटलबिहारी वाजपेयी नंतर भारतीय जनता पार्टीचे दुसरे पंतप्रधान. स्व. वाजपेयीजीं यांनी २४ पक्षांच्या सरकाराचे नेतृत्व केलं, तर मोदीजी हे भारतीय जनता पार्टीचे पूर्ण बहुमताच्या सरकारचे नेतृत्व करीत आहेत.

१४ प्रधानमंत्र्यांपैकी स्व. विश्वनाथ प्रतपासिंग (२ वर्षं उत्तर प्रदेश राज्य), स्व. मोरारजी देसाई (४ वर्षं मुंबई राज्य), स्व. नरसिंहराव (२ वर्षं आंध्र प्रदेश राज्य), देवेगोडा (२ वर्षं कर्नाटक राज्य ) आणि नरेंद्र मोदी (१३ वर्षं गुजरात राज्य) यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्यकारभार केला. पण नरेंद्र मोदीजी यांनी सर्वांपेक्षा जास्त काळ म्हणजे तब्बल १३ वर्षं म्हणून गुजरात राज्याचे नेतृत्व केलं. इतर सर्व विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री झाले, तर मोदीजी हे प्रथम मुख्यमंत्री आणि नंतर आमदार झाले.

मोदीजी हे असे एकमेव नेते, की जे प्रधानमंत्री होण्यापूर्वी ना कधी खासदार होते, ना केंद्रात मंत्री. २०१४ साली ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले आणि देशाचे पंतप्रधान झाले. स्वतंत्र भारतात जन्मलेले नरेंद्र मोदीजी हे या देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. संसदेच्या पहिल्यांदा पायऱ्या चढण्यापूर्वी मस्तक टेकवून त्या वास्तूला नमस्कार करणारे नरेंद्र मोदीजी हे पहिले नेते आहेत.

आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत गुजरातला प्रगतीशील राज्याच्या मानांकनात वरचे स्थान मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या कामाचा आवाका बघून काँग्रेसने त्यांची धास्ती घेतली आणि त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे छळ केला. गुजरात मधील दंग्यांचे भूत उभे करण्यात आले. विशेष चौकशी दलाने (एसआयटी) ने सलग ९ तास त्यांची चौकशी केली. त्याच काळात केंद्रीय गृहमंत्री असलेल्या चिदंबरम यांनी ‘भगवा दहशतवाद’ हा शब्दप्रयोग केला. भारतातच नव्हे तर जगभरात मोदीजींची बदनामी करण्याचा निंदनीय प्रयत्न करण्यात आला. पण या सर्वाला नरेंद्र मोदीजी पुरून उरले आणि कालांतराने देशाचे पंतप्रधानही तर झालेच पण एक जगनमान्य नेतेही झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील भारताची वाटचाल ही शेतकरी, कामगार व सर्वसामान्य व्यक्तीला न्याय देण्यापासून ते आर्टिफिशियल इंटिलिजन्स(एआय) पर्यंत, तीन तलाकची कुप्रथा मोडीत काढण्यापासून ते राम मंदिराच्या उभारणीपर्यंत, नवीन शैक्षणिक धोरणापासून ते नवनवीन मेडिकल, तंत्रशिक्षण, आयआयटी संस्था निर्माण करण्यापर्यंत, पठाणकोट व उरीच्या हल्ल्याच्या बदल्यापासून ते ३७० कलम रद्द करेपर्यंत अशा अनेक ऐतिहासिक निर्णयांनी भरलेली आहे. कोरोना महामारीविरुद्ध लढताना ३० कोटी लोकसंख्येची अमेरिका मेटाकुटीला आली पण त्याच कोरोनाविरोधाच्या लढाईत १३० कोटी जनतेला सुरक्षित ठेवण्याचे काम नरेंद्र मोदीजी अत्यंत खंबीरपणे करत आहेत.

गोव्याचे आणि मोदीजी यांचं एक विशेष नातं आहे. गोध्रा दंगलीनंतर मोदीजींनी राजीनामा द्यावा अशी मागणी झाली होती. सदर आरोप व मागणी २००२ साली भारतीय जनता पार्टीच्या गोव्यात झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत फेटाळण्यात येऊन त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवण्यात आला. गोध्रा संबंधातील केसमधून त्यांना मुक्त करण्याचा निर्णय कोर्टाने जाहीर केला त्यावेळी ते गोव्यात स्व. मनोहर पर्रीकरांच्या मुलाच्या लग्नासाठी उपस्थित होते. २०१३ साली गोव्यात झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टीचे प्रचार प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली. २०१४ साली प्रधानमंत्री झाल्यानंतर जर कोणत्या राज्याला भेट दिली असेल तर ते गोवा राज्य आहे. स्व. मनोहर पर्रीकर यांची केंद्रीय मंत्रीमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमणूक करून गोव्यातील कोणत्याही नेत्याला मिळाले नाही असे स्थान नरेंद्र मोदीजी मुळेच गोव्याला मिळाले.
अशा या लोकमान्य, कर्तृत्ववान व विश्वमान्य नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

-नरेंद्र सावईकर

हा व्हिडिओ पहाः Narendra Modi Birthday | चक्क भंगाराच्या साहित्यापासून साकारला मोदींचा पुतळा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!