चिपळुणातील महापुराचं कव्हरेज करायला चाललेल्या पत्रकाराचा अंगावर काटा आणणारा अनुभव

टीव्ही ९ मराठीचे रिपोर्टर अक्षय कुडकेलवार यांचा थरारक अनुभव

Goan Varta Live | प्रतिनिधी

महापुराच्या कव्हरेजपूर्वीची भयाण रात्र…!

आषाढी एकादशीचे कव्हरेज करुन पंढरपूरहून नुकताच घरी परतलो होतो. महाड चिपळूण या भागात पावसाचा जोर वाढला. पाणी शिरण्यास सुरुवात अशा बातम्यांचे फ्लॅश स्थानिक प्रतिनिधीकडून गृपवर पडत होते. मुंबईत पावसाचा जोर वाढत होता. वीकऑफ असल्याने दिवसभर घरगुती कामात गेला. रात्री उशिरा विदर्भ दौऱ्यावर निघालेल्या मनसे नेत्यांपैकी एकाचा फोन आला.

“अक्षय कसारा घाटात दरड कोसळलीय, ओव्हर हेड वायर तुटल्याने आम्ही साधारण दोन तास झाले अमरावती एक्सप्रेस मध्ये अडकलोय. भयंकर पाऊस आहे, आमचा पुढला प्रवास होईल असं वाटत नाही. कुण्या अधिकाऱ्यांशी संपर्क होत नाहीए.”

मी या फोनला “ओके बघतो” एवढा रिप्लाय दिला आणि ऑफिसच्या कानावर ही बातमी घालून लगेच नाईट रिपोर्टर पाठवला. बऱ्याच ठिकाणी दरडी कोसळल्याची माहिती ऑफीसला येत होती. त्यामुळे ऑफीसमधून आणखी एक सहकारी विनायक डावरुंग याला मध्यरात्री इगतपुरीच्या दिशेने पाठवण्यात आले.

सकाळी चिपळूण पाण्याखाली जातंय अशी बातमी आली, मी त्यावेळी राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी होतो. इतर चॅनलच्या सहकाऱ्यांशी चिपळूनची चर्चा सुरु होती अशातच आमचे इनपूट हेड मोहन देशमुख यांचा “तयारीत रहा, जावं लागेल” असा फोन आला. मी लगेच घरी आलो, तळमजल्यावर असलेल्या डिपार्टमेंटलस्टोअर मध्ये पाण्याच्या बॉटल, बिस्कीट्स, ड्रायफ्रूट, डेटॉल या सगळ्या अत्यावश्यक गोष्टींची यादी दिली. बॅग भरुन दहाव्या मिनिटाला बाहेर पडलो. महाड मध्ये पाणी शिरल्याने मुंबई-गोवा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे पुणे – सातारा- पाटण-कुंभार्लीघाट हा मार्ग प्रवासासाठी ठरवण्यात आला. सगळीकडे धो-धो पाऊस कोसळत होती. सुरुवातीला साताऱ्यापर्यंत एबीपी न्यूज मधील माझे जुने वरीष्ठ सहकारी रौनक कुकडे यांची गाडी सोबत होती. मात्र त्यांनी पाऊस बघता कराडमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. ठरलेल्या मार्गावरून दोन तासापूर्वीच आमचा एक प्रतिनिधी कुंभार्ली घाट उतरुन शिरगावात पोहचला होता. त्याठिकाणी मोहन देशमुख यांनी आमच्या मुक्कामाची व्यवस्था करुन ठेवली होती. त्यामुळे मी पुढच्या प्रवासाला निघालो.

हेही वाचा : जगाचा विनाश जवळ आलाय? चीनमध्ये महाप्रलय! पाहा महापुराचे महाभयंकर Video

साताऱ्यात जेवण करुन निघायला रात्रीचे साडेअकरा झाले होते. साधारण एकच्या सुमारास मी कुंभार्ली घाटात पोहचलो. भयंकर पाऊस, दाट धुकं, कीर्र अंधार, पाऊस आणि घाटातील धबधब्यांचा धो-धो आवाज अशा वातावरणातून आमची वेड्या-वाकड्या वळणाने गाडी पुढे सरकत होती. माझा थोडा डोळा लागला होता आणि अचानक ड्रायव्हर ने ब्रेक दाबले आणि मला आवाज दिला. पुढे एका मोठ्या धबधब्यालगतची दरड कोसळली होती. कोसळलेल्या दरडीहून धबधब्याचा जोर आणखी वाढला होता. गाडीच्या काचेवरील आतून आलेला फॉग पुसला तर बाजूला काळ्या कातळ दगडाचा सरळ रेषेत उभा डोंगराचा भाग होता. दुसऱ्या बाजूला दरी असल्याचे पुढच्या काचेतून कळत होते. रस्ता अगदी निमुळता असल्याने त्या ठिकाणी गाडी उभी करु शकत नव्हतो. आलो त्या रस्त्यावर मागे जर दरड कोसळली तर आम्ही अडकून पडलो असतो. मी लगेच गाडी मागे घेवून ज्याठिकाणी थोडी ‘टेबललॅंड’ असेल अशाठिकाणी पार्क करण्याच्या सूचना ड्रायव्हरला दिल्या. गाडी यू टर्न घेणे केवळ अशक्यच होते. तशीच रिव्हर्सने आम्ही बऱ्याच अंतरावर गाडी मागे आणली. घाटाच्या सुरुवातीला असलेल्या एका पोलीस चौकीबाहेर आम्ही थांबलो. आता रात्र गाडीत काढण्यावाचून पर्याय नव्हता. या भयान रात्रीच्या सोबतीला आमची एकच गाडी उभी होती.

साधारण तासाभरानंतर या मार्गाने पुण्याहून-चिपळूणसाठी निघालेल्या एनडीआरएफच्या दोन टीम याठिकाणी आल्या. दरड कोसळल्याने या टीमला देखील पुढचा प्रवास करता येणार नव्हता. त्यांच्या गाड्या जशा पुढे गेल्या तशाच मागे आल्या. एका टीम दरडीच्या पुढे जावून आली तर त्यांनी या पेक्षा भितीदायक बाब सांगितली फक्त एक नाही तर पुढे एकूण सहा दरडी कोसळल्या आणि एकाठिकाणी रस्त्याचा काही भाग वाहून गेलाय. त्यांनी ताबडतोब सॅटेलाईट फोनवरुन काही फोन केले. जेसीबी यायला सकाळ होणार होती. तसेच #NDRF चे काही जवान खाली उतरले. हातात फावडे आणि काही अवजार घेवून पुढे गेले.

हेही वाचा : सिंधुदुर्गातील वाघिण पोचली गोव्यातील म्हादईत अभयारण्यात

आमच्या गाडीजवळ एक टीम उभी होती. मी त्यांच्याशी चर्चा करुन गाडीत जावून बसलो. डोळे जड झाले होते पण मिटत नव्हते. गाडीच्या काचातून बाहेरचे काही स्पष्ट दिसत नव्हते. एका कुत्र्यावर एनडीआरएफच्या जवानांनी टॉर्चलाईट मारला. तो कुत्रा माझ्या गाडीजवळून मागच्या बाजूला गेला. थोड्या वेळाने मी गाडीखाली उतरलो तर लगेच #NDRF चे जवान माझ्यावर ओरडले.

“सर खाली का उतरलात, आधी गाडीत बसा! तुम्ही त्या बिबट्याला बघितले नाही का? की तुम्ही रिपोर्टर आहे म्हणून तो तुम्हाला काही करणार नाही? जेव्हा रोड क्लीअर होईल तेव्हा तुम्हाला कळवू!”

माझ्या लक्षात आले की ज्या कुत्र्याला मी गाडीतून बघितले होते तो कुत्रा नव्हता तर बिबट्या होता. बऱ्यापैका घाबरायला झालं. मी तसाच गाडीत येवून बसलो आणि डोळा लागला,काही वेळाने डोळा उघडला. गाडीची हेडलाईट सुरु केली तर समोर एनडीआरएफची टीम नव्हती. मग आम्हीही पुढे प्रवास करायला सुरुवात केली. हलकासा दिवस उजाडल्यासारखा होता. चिपळूणच्या दिशेने एक जेसीबी वर घाटात आली होती. त्यांनी आम्हाला थोडा रस्ता मोकळा करुन दिला. सकाळी साडेसहाच्या सुमारास आम्ही चिपळूणच्या खेर्डी गावात पोहचलो. दिवसभर चिपळूण पुरानंतरच्या विदारक वास्तवाचे रिपोर्टींग करताना, तात्पुरता विस्मृतीत गेला. मात्र ती रात्र आठवली तर अंगावर अजूनही काटा येतो एवढी भयाण रात्र होती..!

हेही वाचा : दीड कोटीच्या दारूनं कोणाकोणाचे घसे केले ‘ओले’?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!