हर एक काम…देश के नाम !

कारगिल युद्धाच्या विजयाला आज २२ वर्षे पूर्ण होताहेत. त्यनिमितानं...

Goan Varta Live | प्रतिनिधी

यंदा २६ जुलै रोजी, कारगिल युद्धाच्या विजयाची २२ वर्षे पूर्ण होताहेत. हा दिवस ‘कारगिल दिवस’ म्हणून पाळला जातो. या लढ्यात देशाच्या सेवेत अनेकांनी प्राणाची आहुती दिली. त्यांचे बलिदान हे अविस्मरणीय आहे. या देशासाठी प्राण देणार्‍या त्या शूर सैनिकांच्या कुटुंबियांचे सध्या काय झाले? कोणाला काळजी आहे का?

आजही मला मे-जून १९९९ मधील ते दिवस आठवतात. माझी आयएनएस हंसा येथून बदली झाली होती व मी नुकताच कोचीच्या आयएनएएस ५५० या नवीन युनिटमध्ये सामील झालेलो. स्क्वॉड्रन एअर इंजिनिअरिंग अधिकारी म्हणून मी नव्या स्क्वॉड्रनमध्ये स्थिरावण्याचो प्रयत्न करत होतो. तीन वेगवेगळ्या प्रकारच्या विमानांसह नव्याने सामील झालेल्या डोर्निअर्सचा यात समावेश असल्याने हे टास्क थोडसे अवघड होते.

जूनच्या सुरवातीच्या काळात एका सायंकाळी मी काम आवरताना एक अधिकारी धावत-पळत माझ्याजवळ आला व म्हणाला की, ‘स्क्वॉड्रॉन कमांडर साबने बुलाया है’. त्यानंतर मी माझ्या स्क्वॉड्रॉन कमांडर कॅप्टन गोपा कुमार यांना भेटायला गेलो. ज्यांनी मला पाहिल्यावर ‘रिलॅक्स फर्डी’, असे म्हणाले (माझ्या आडनाव फर्नांडिसचे छोटा फॉर्म) तिथे मला संबोधले जायचे. त्यांनी मला चहाचा कप दिला आणि म्हणाले, तू नुकताच कोचीला आला आहेस आणि तुला एक लहान मूल आहे. पण काळजी करू नकोस. त्यांचे आयुष्य आरामदायक बनविण्यासाठी जी काही मदत हवी असेल, ती आम्ही पुरवू. पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला समजला नाही. परंतु, मला जाणवले होते, की आम्हाला काही दिवस कुठेतरी तैनात व्हावे लागणार आहे.

त्यांनी नमूद केले की, एअर फोर्स एएन-३२ कोची येथे सकाळी उतरेल व आम्हाला जाऊन त्याठिकाणी युद्धात सामील व्हावे लागेल. त्यांनी मला या क्षेत्राबद्दल थोडक्यात सांगितले, जिथे आम्हाला विमानासह तैनात होण्याची शक्यता आहे. त्यांच्या कार्यालयातून बाहेर आल्यावर मी रात्रीच्या ड्युटीवरील कर्मचार्‍यांना विमानाच्या सर्व बाबी, तोफा शस्त्रे, दारूगोळे, सुटे, पीओएल, ग्राउंड पॉवर युनिट, कागदपत्रे आदी तयार करण्यास सांगितले.

या मिशनला जाताना माझ्यासह इतर कुणालाच खात्री नव्हती, की आम्ही जिवंत माघारी परतणार की नाही. मात्र, देशासाठी लढा देण्याच्या विचाराने आम्हाला उत्साह व बळ मिळाले होते. त्यानंतर आम्ही मोहिमेत सामील होण्यासाठी गणवेश परिधान करण्यास घेतले.

सुदैवाने आम्ही गोवामार्गे उड्डाण केले. मध्यंतरी दाबोळी येथे इंधन भरण्यासाठी थांबलो. वेळ मिळाल्याने मी घराच्यांना फोन कॉल करीत, ‘मी घरी सुरक्षित परत येईन याची कुटूंबियांना हमी दिली.’ विशेष म्हणजे, माझ्या आई-वडिलांनी मला शुभेच्छा देत सांगितले की, आमचा मुलगा देशसेवेत जात आहे, आणि हा त्यांच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.

त्यानंतर आम्ही पूर्वोत्तर सेक्टरमध्ये कुठेतरी फॉरवर्ड ऑपरेटिंग बेसमध्ये उतरलो (स्थान जाहीर केले जाऊ शकत नाही) आणि आम्हाला जवळच्या तळावर नेले गेले. यावेळी आम्ही आसपासचा तणाव जाणवू शकत होतो व या स्थितीमुळेच आम्हाला कठीण लढाईसाठी तत्परतेने समायोजित करता आले. आम्ही जवळपास ५० दिवस या भागात घालवले आणि मी घेतलेली ती उड्डाणे मला आजही आठवतात.

आमचे पायलट तसेच निरीक्षक जवळपास १२-१६ तास उड्डाण घेत होते व विश्रांतीला वेळ नसायचा. फॉरवर्ड ऑपरेटिंग बेसमधील सर्वजण एकत्र युनिटसारखे बनले होते. हे दिवस आमच्यासाठी काही अतिशय अविस्मरणीय क्षण होते. विशेषतः काही द्रुत निर्णय घेण्याच्या संदर्भात मला एक उत्तम अनुभव आले. काहीवेळा विमानासंबंधिच्या नियमांचे पुस्तकी ज्ञान दुर्लक्ष करण्याचेही क्षण आले.

मला एक तणावपूर्ण परिस्थिती आठवते, जेव्हा आमचे एक विमान रडारवरून भरकटले व शेवटी ते विमान पुन्हा परतले, तेव्हा सर मदन शेरगिल, आता कमांडर शेरगिल (नेव्हल हेडक्वार्टर दिल्ली) येथे तैनात आहेत. त्यांनी सांगितले की, एफ-१६च्या गोळ्याच्या मार्‍यापासून वाचण्यासाठी फारच खालच्या स्तरावरन त्यांना उड्डाण करावे लागले.

आमची मोहीम नंतर संपुष्टात आली, जेव्हा अमेरिकेने मध्यस्ती करीत भारताचे पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात शांतता करारावर स्वाक्षर्‍या झाल्या. त्यानंतर नवाझ शरीफ यांनी जनरल परवेझ मुशर्रफ यांना सैन्य दलातून बाहेरचा रस्ता दाखविला.

आम्ही कोचीला परत आल्यावर कारगिल मोहिमेत सहभागासाठी सरकारने विजय स्टार तसेच विजय पदक पुरस्कार जाहीर केले. युद्धामध्ये भाग घेण्याची संधी मिळाल्यामुळे हा माझ्यासाठी नेहमीच अभिमानाचा क्षण राहिल.

आम्ही आणखी एका विजय दिवसाच्या जवळ येत असताना, या युद्धात आपल्या देशाचे व सीमेचे रक्षण करण्यार्‍या हजारो सैनिकांचे प्राण गेले त्यांना मी आदरांजली वाहत वंदन करतो. या युद्धातून एक धडा मिळाला की, देशाच्या नेत्यांनी आपल्या शत्रूंवर कधीही विश्वास ठेऊ नये.

मी गोव्यातील पालकांनाही विनंती करतो की, त्यांनी आपल्या पाल्यांना लष्करी सेवेत रूजू होण्यासाठी गांभीर्याने विचार करण्यास प्रोत्साहित करावे. पगार कदाचित कॉर्पोरेट जगता इतका नसला, तरी निश्चितपणे अधिक संघटित, सुरक्षित आणि आजीवन पेन्शन मिळेल. हा अनुभव व्यक्तीला जीवनाचे मूल्यमापन करण्यास, शिस्तीचे अनुसरण करण्यास आणि उदाहरणाद्वारे जीवन जगण्यास शिकवतो.

मला वाटते की, आमच्याकडे किमान २-३ वर्षे सक्तीची सैन सेवा असायला हवी. जेणेकरून आपल्याकडे देशाचा पैसा लुटण्याऐवजी समर्पण व निष्ठा असलेले प्रामाणिक नेतृत्व तयार होईल.

– कॅप्टन व्हिरीएतो फर्नांडिस

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!