…अन् फुटबॉलच्या मैदानावरच एरिक्सननं जिंकला ‘गेम ऑफ लाईफ ‘

मृत्युच्या दारात पोहोचलेल्या एरिक्सनला त्याचे सहकारी, मेडिकल स्टाफ आणि असंख्य प्रार्थनांनीच आणले परत

Goan Varta Live | प्रतिनिधी

फुटबॉलला खेळांचा राजा आणि गेम ऑफ लाईफ असे का म्हणतात? याचा संपूर्ण जगाला काल प्रत्यय आला. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये युरो 2020 स्पर्धेतील यजमान डेन्मार्क आणि फिनलंड यांच्या दरम्यान रंगतदार सामना पहिल्या हाफच्या समाप्तीकडे निघाला होता. सामन्याच्या 42 व्या मिनिटाला डेन्मार्कच्या आक्रमणाची धुरा सांभाळणारा आणि त्यांचा सर्वात मोठा सुपरस्टार ख्रिश्चन एरिक्सन फिनलंडच्या हाफमध्ये असताना अचानक मैदानावर कोसळून बेशुध्द झाला. ही खेळातील नेहमीच्या चढाओढीची दुखापत नव्हती तर वेगळीच अतिशय गंभीर गोष्ट होती. हे त्वरीतच मैदानातील दोन्ही संघाचे खेळाडू, रेफरी, प्रेक्षक, टीव्ही कॉमेंटेटर तसेच हा सामना पाहणार्‍या जगभरातील कोट्यवधी प्रेक्षकांच्या लक्षात आले.

एरिक्सनला कार्डिएक अरेस्टचा अ‍ॅटॅक आला होता. त्याची वळलेली बोबडी, उघडेच निस्तेज डोळे पाहून डेन्मार्कचा कॅप्टन कायजरने त्याचे डोके आपल्या मांडीवर घेत क्षणाचाही वेळ न दवडता मेडिकल स्टाफला त्वरीत मैदानात येण्याचा इशारा केला. काही सेकंदातच डेन्मार्क तसेच यूएफाचा मेडिकल स्टाफ एरिक्सनची अवस्था पाहण्यासाठी आला. त्यावेळी डेन्मार्कचा हा 29 वर्षीय खेळाडू साक्षात मृत्यूच्या दाढेत पोहोचला होता. त्याच्या हृदयाची धडधड मंदावली तर श्वासही थांबला होता. अशा मेडिकल इमर्जन्सीला स्पोर्टस मेडिकल स्टाफला अपवादानेच सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांनी आपल्याकडे अशा प्रसंगांसाठी असणार्‍या प्राथमिक ज्ञानाचा वापर करुन सीपीआर सुरु केले. सीपीआर म्हणजे छातीवर विशिष्ट पध्दतीने दाब देउन हृदयाचे काम बंद पडू न देण्याची प्राथमिक उपचार पध्दतीे. याचवेळी एरिक्सनच्या तोंडावर मास्कही चढवून त्याला कृत्रिम पध्दतीने ऑक्सिजन देण्याचे काम सुरु होते.

ही सर्व दृश्ये प्रेक्षकांना विचलीत करणार होती. त्यामुळे डेन्मार्कच्या खेळाडुंनी ह्यूमन वॉल बनवून एरिक्सनवर सुरु असणार्‍या उपचारांना लपवले. आपल्या सहकार्‍याची अशी अवस्था पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते. तीच अवस्था प्रेक्षक तसेच या स्पर्धेत पदार्पण करणार्‍या फिनलंडच्या खेळाडुंचीही होती. ते विमनस्क अवस्थेत मैदानावर बसून राहिले होते.

दरम्यान, प्रेक्षकांमध्ये उपस्थित एरिक्सनची पत्नी मैदानावर आली होती. तिला ओक्साबोक्सी रडताना पाहून कायजर आणि गोलकिपर कॅस्पर श्मायकलने तिची समजूत घालून सर्व काही व्यवस्थित होईल असा धीर दिला. अखेर तब्बल 20 मिनिटे सीपीआर दिल्यानंतर एरिक्सन उपचारांना किंचित प्रतिसाद देउ लागला. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला दवाखान्यात हलवण्याचा निर्णय घेतला. त्याला स्ट्रेचरवरुन घेउन जाताना लोकांना पाहू नये म्हणून फिनलंडच्या एका प्रेक्षकाने आपल्याकडील राष्ट्रध्वज आडोसा करण्यासाठी दिला. अखेर एरिक्सनला हॉस्पिटलमध्ये नेऊन प्रॉपर ट्रिटमेंट सुरु केल्यावर त्याची प्रकृती स्थिर होऊ लागली. याबाबत युएफाने अधिकृत माहिती दिल्यानंतर एरिक्सनच्या सहकार्‍यांसह त्याच्या सहीसलामतीसाठी मनापासून प्रार्थना करणार्‍या जगभरातील कोट्यवधी फुटबॉलप्रेमींचा जीव भांड्यात पडला.

फुटबॉलच्या मैदानावर अर्ध्या तासात घडलेला हा अद्भूत घटनाक्रम एख़ाद्या फिल्मी कथेला साजेसाच होता. शब्दश: मृत्युच्या दारात पोहोचलेल्या एरिक्सनला त्याचे सहकारी, मेडिकल स्टाफ आणि असंख्य प्रार्थनांनीच परत आणले. एरिक्सनवर प्राथमिक उपचार करण्यात अगदी काही सेकंदांचा उशिर झाला असला तरी त्याचा जीव वाचवता आला नसता. फुटबॉलच्या मैदानावर दिसलेला प्रेम, काळजी आणि भावनांचा अद्भूत खेळ अविस्मरणीयच.

दीपक पाटील, जर्नलिस्ट-सोशल मीडिया एक्स्पर्ट 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!