एक हजारो में मेरी बहना है…

रक्षाबंधन - नारळी पौर्णिमा विशेष

रुपेश पाटील | प्रतिनिधी

जागतिक पातळीवर आपली भारतीय संस्कृती ही अत्यंत महान संस्कृती म्हणून परिचित आहे. भारतात साजरा होणाऱ्या विविध सण-उत्सवांना विशिष्ट परंपरा आहे. त्यांचे अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व आहे. मराठी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा अर्थातच रक्षाबंधन. हिंदू संस्कृतीनुसार रक्षाबंधनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतातील कानाकोपऱ्यात रक्षाबंधनाचा सण उत्साहाने साजरा केला जातो. एवढेच नव्हे तर जगात विविध देशात प्रांतात राहणारे भारतीय नागरिक रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. अगदी पाश्चात्य देशात जरी आपला भाऊ राहत असेल तरी भारतात राहणारी त्याची बहीण त्याला रक्षाबंधनाला राखी पाठवीत असते. ह्या राखीतून बहीण आणि भावामधील अतूट आणि रेशमी अशा पवित्र बंधनाचा हा एक प्रकारे भारतीय संस्कारच म्हणावा लागेल.

भावाप्रती बहिणीचे असलेले निस्सीम प्रेम म्हणजे रक्षाबंधन. भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून आपल्या भावाला दीर्घ आयुष्य मिळून त्याचे संपूर्ण आयुष्य हे सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाण्यासाठी बहिणीकडून दिलेले हे आशीर्वादरूपी स्नेहाचे प्रतीक असते. राखी बांधण्याचा अर्थ असा की आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्याचे अभिवचन रक्षाबंधनाच्या माध्यमातून बंधुराज देत असतो. भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवीचे रूप मानले जाते. अशा देवीरुपाचे प्रतिक असलेली बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार व सदबुद्धी जागृत राहण्यासाठीची ही पूजा असते. सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार भोग, लोभ, वासना, मत्सर, राग, द्वेष अशा विविध अवगुणांकडे आपल्या भावाने त्याच्या तिसऱ्या नेत्राने पहावे म्हणून या उदात्त हेतूने बहिण आपल्या भावाला टिळा लावून त्याला त्रिलोचन बनविते. इतका गहण अर्थ त्यामागचा आहे.

राखीचा धागा हा नुसताच धागा नसून ते एक वचन आहे. आपल्या बहिणीच्या आजन्म रक्षणाचे आणि तिच्या स्नेहाचे पवित्र बंधनाचे ते प्रतीक आहे. महाभारतात द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला अर्थात कृष्णाला बांधलेली जरतारी शेल्याची चिंधी म्हणजेच गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला तो एक धागा आहे. त्या धाग्याच्या माध्यमातून बहिण-भावातील पवित्र बंधनाचा हा स्नेह सोहळाच आहे. अनेक बाबतीत रक्षाबंधन हा सण परिचित आहे.

कोकणात तर रक्षाबंधन अर्थात नारळी पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुणदेवतेला मनोभावे आवाहन करत समुद्र देवतेला नारळ अर्पण केला जातो. याचाच अर्थ असा की या दिवशी समुद्राची विधीवत पूजा केली जाते. यामागील अध्यात्मिक आणि वैज्ञानिकही कारणे आहेत. नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपतत्वात यमलहरींचे आधिक्य असल्यामुळे व नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व यमलहरींना ताब्यात ठेवत असल्यामुळे, एक प्रकारे जलावर ताबा मिळवणाऱ्या सागररुपी वरुणदेवतेला नारळ अर्पण केला जातो.

याच दिवशी ब्रम्हांडात आपतत्वात यमलहरींचे आधिक्य असते. या लहरी ब्रह्मांडात भोवऱ्याप्रमाणे गतिमान असतात. वरुणदेवता जलावर ताबा मिळवणारी व त्यांचे संयमन करणारी असल्यामुळे नारळी पौर्णिमेला सागररूपी वरुणदेवतेला आवाहन करून नारळाचे अर्पण करतात. वरुणदेवतेला आवाहन करताना त्याच्या कृपाशीर्वादाने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकृष्ट होतात. पाण्यातील नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व या यमलहरींना ताब्यात ठेवून त्यांच्यातील रज-तम कणांचे विघटन करून त्यांना सागरात विलीन करते. म्हणून नारळी पौर्णिमेला वायूमंडलातील यमलहरींचे नारळाच्या माध्यमातून उच्चाटन करून सागररूपी वरुणदेवतेच्या चरणी त्यांचे समर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. यामुळेच वायुमंडळाची ही शुद्धी होते. अशी या मागची पार्श्वभूमी आहे.

भाऊ आणि बहिणीच्या पवित्र अशा रक्षा बंधनाच्या मुहूर्तावर भाऊ बहिणीला आपल्याकडून जे शक्य असेल ते गिफ्ट देतात. आपल्या बहिणीच्या स्नेहाच्या अनुषंगाने बंधू राजे आपल्या बहिणीचे आजन्म रक्षण करण्याची व तिचा सांभाळ करण्याची ग्वाही देतात. भावाने दिलेले बक्षीस बहिण हसतमुखाने स्वीकार करते.अशा या पवित्र रक्षाबंधनाच्यावर अनेक कविता व गीते रचली गेली आहेत. हिंदी सिनेमासृष्टीत तर रक्षाबंधन या विषयावर अनेक चित्रपट निर्माण झाले आहेत. असंख्य गीतेही लिहिली गेलीआहेत. ”फुलोंका तारोंका सबका कहना है, एक हजारो में, मेरी बहना है..!” असे म्हणणारा भाऊ आणि “भैया मेरे राखी के बंधन को निभाना…!” असे म्हणत भावाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणारी बहिण यांच्या मांगल्याचे प्रतिक म्हणजे रक्षाबंधन होय. आपणा सर्वाना या पवित्र व मंगलमय रक्षाबंधनाच्या हृदयापासून शुभेच्छा…!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!