अंतर्बाह्य बदलून टाकणारी ‘दिठी’

वस्तुस्थितीवर थेट भाष्य करणारे संवाद आणि समर्पक छायाचित्रण याचा सुंदर मिलाफ ‘दिठी’मध्ये दिसून येतो

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

दु:ख म्हणजे काय? दु:खी होण्यामागची कारणे कोणती? त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणती मनोवस्था किंवा कोणती दृष्टी असावी, याची उकल ‘दिठी’ या चित्रपटातून करण्यात आलीय. दुसर्‍याच्या सुखासाठी जगताना स्वत:च्या वेदनेला विसरून जाणे हाच त्यावरचा तरणोपाय. देवावरील श्रद्धा, भक्तीमार्ग आणि विवेकबुद्धीच्या जोडीला हा शहाणपणा आला की, सर्वस्व गमावूनसुद्धा हतबुद्ध न होण्याची विलक्षण जीवनकला गवसते, हाच संदेश ही कलाकृती देते.

‘दिठी’ चित्रपटाच्या पूर्वार्धात एक प्रसंग आहे. पंढरपुरच्या वाटेवर असणारे वारकरी एका मंदिरात विश्रांतीसाठी थांबले आहेत. दरवर्षी वारी करणारा, वृद्धत्वाकडे झुकलेला रामजी लोहार (किशोर कदम) हातातल्या भांड्यातून पेल्यात पाणी ओततो. ते पिण्यासाठी तोंडाजवळ नेतो, तोच समोर पदरचं पाणी संपलेला वृद्ध वारकरी दिसतो. रामजी स्वत: पाणी न पिता ‘माऊली…’ म्हणत त्या वारकर्‍यासमोर पेला नेतो. पाणी न घेता तो वारकरी विचारतो,
‘कोण म्हणायचं?’
‘रामजी’
‘तसं नव्हं, पण कोण म्हणायचं?’
वृद्ध वारकर्‍याच्या प्रश्नातला खोचकपणा जाणून रामजी नम्रपणे प्रतिप्रश्न करतो,
‘कोण म्हणून सांगू? गोरा कुंभार म्हणू? सावता माळी म्हणू? का तुक्या वाणी म्हणू? चोखा मेळा म्हणू, विसोबा खेचर म्हणू का… बामणाचा ग्यानबा म्हणू? विठ्ठलाला काय फरक पडतो सांगा..?’
या सलग प्रश्नावलीने संशयाची पुटं दूर झालेला वारकरी गदगदलेल्या सुरात ‘माऊली…’ म्हणून हात जोडतो आणि रामजीने दिलेलं पाणी स्वीकारतो!

मोजकेच पण वस्तुस्थितीवर थेट भाष्य करणारे गोळीबंद संवाद आणि समर्पक छायाचित्रण याचा सुंदर मिलाफ ‘दिठी’मध्ये दिसून येतो. जगण्याचा अर्थ शोधणार्‍या आशयघन चित्रपटांसाठी ओळखल्या जाणार्‍या दिवंगत दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचा हा शेवटचा चित्रपट. वारकर्‍यांच्या जीवनातील आध्यात्मिक आणि पारिवारिक पातळीवरील द्वंद्व आणि त्यातील द्वैतभाव टिपणारी ही कलाकृती. दु:ख म्हणजे काय? दु:खी होण्यामागची कारणे कोणती? त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणती मनोवस्था किंवा कोणती दृष्टी असावी, याची उकल या चित्रपटातून करण्यात आलीय.

‘दिठी’ म्हणजे दृष्टी. हा चित्रपट सोनी-लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला आहे. 1940 नंतरच्या मराठी नवकथाविश्वातील सिद्धहस्त लेखक दि. बा. मोकाशी यांची गाजलेल्या ‘आता आमोद सुनासि आले’ या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. मौज मासिकाच्या 1959 च्या अंकात ही कथा प्रसिद्ध झाली होती. कथेचे शीर्षक संत ज्ञानेश्वरांच्या ‘अमृतानुभव’मधील ‘आता आमोद सुनासि आले । श्रुतीशी श्रवण निघाले’ या प्रकरणातील ओवीवर आधारित आहे.

इतर चित्रपटांप्रमाणेच ‘दिठी’चीही साधी, सोपी पटकथा. वर्षानुवर्षे पंढरपुरची वारी करणार्‍या रामजी लोहाराची ही कहाणी. कहाणी कसली? एकुलत्या मुलाच्या अकाली वियोगाने दु:खाच्या गर्तेत लोटल्या गेलेल्या अभागी बापाची व्यथाच! त्यात अवेळी बाळंत झालेली सून आणि तिची तान्हुली. आयुष्याच्या उत्तरार्धात नेत्र पैलतिराकडे लागलेले असताना तरणा मुलगा पुरात वाहून गेला, हे दु:ख पचवताना रामजी आपल्या विठ्ठलभक्तीबाबत प्रश्नांकित होतो. भवतालाच्या परिघात असलेले सोबती त्याच्या या मनोवस्थेबद्दल व्याकूळ होतात खरे, पण रामजीला त्यातून बाहेर कसे काढणार, या प्रश्नाचे उत्तर त्यांनाही मिळत नाही. या अवघड वळणावर हा गुंता सोडवण्यास कारणीभूत ठरते एक गाभण गाय. प्रसुती होण्यात अडथळे येत असल्यामुळे गायीच्या मालकासमोर मोठा पेच उभा राहतो. मुके जनावर वेदनाव्याकूळ होऊन हतबल बनते. अशा वेळी या कामात हातखंडा असणारा रामजी लोहार हा एकच आशेचा किरण दिसू लागतो. पण ज्याने स्वत:च्या मुलाला गमावलंय, तो या गाईला कसा मोकळा करणार, असा तिढा निर्माण होतो. या मानसिक द्वंद्वात ‘रामजी, बाबा धाव’ अशी आर्त हाक कानी पडताच रामजीमधला ‘बाप’ जागा होतो. गायीच्या पोटावर, पाठीवर मायेने हात फिरवत तो जन्म-मृत्यूचे जणू तत्वज्ञानच कथन करतो. ते मुके जनावरही त्याला प्रतिसाद देते. रामजीच्या हातगुणामुळे गाय व्याल्यानंतर तिच्या पाडसाला बघून रामजीही सुखावतो. तिकडे त्याचे सवंगडी पोथी वाचनासाठी त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. पाऊस कोसळू लागतो. काही काळ मुलाला गमावण्याचे दु:ख विसरलेला रामजी पुन्हा दु:खी मनोवस्थेत जातो. निर्विकारपणे पोथी वाचनासाठी मुकाट्याने बसतो. पोथी वाचनाचा शेवटचा टप्पा पार पाडायचा शिल्लक असतो. सवंगडी ज्ञानेश्वरांच्या ओवी गाऊ लागतात. प्रसुतीवेदनांतून गायीला सोडवलेला रामजी त्या ओवींच्या गायनात तल्लीन होतो. दु:ख विसरून पुन्हा एकदा नामसंकिर्तनाशी तादात्म्य पावतो.

घनघोर पडणारा पाऊस, अविरत वाहणारा नदीप्रवाह ही कथेच्या सुरुवातीची पात्रे. मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या रामजीच्या आयुष्याचा अवकाश व्यापून राहिलेली वेदना आणि त्या अनुषंगाने मानवी जीवनातील दु:खाची परिभाषा मांडण्यात चित्रपटाची टीम यशस्वी झाली आहे. स्वत:च्या दु:खापलीकडेही दुसरे जग असते. दुसर्‍याच्या सुखासाठी जगताना स्वत:च्या वेदनेला नकळतपणे विसरून जाणे, जे हातातून निसटले आहे, त्याची अढी अकारण न वागवणे हाच त्यावरचा तरणोपाय. देवावरील श्रद्धा, भक्तीमार्ग आणि विवेकबुद्धीच्या जोडीला हा शहाणपणा आला की, सर्वस्व गमावूनसुद्धा हतबुद्ध न होण्याची विलक्षण जीवनकला गवसते, हाच संदेश ही कलाकृती देते. ‘आता आमोद सुनासि आले । श्रुतीशी श्रवण निघाले’चा अर्थ असा घेता येईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!