कोण होतीस तू.. काय झालीस तू..

कोविडने ‘जीएमसी’चं वाभाडंच काढलं

Goan Varta Live | प्रतिनिधी

साखळीः ‘जीएमसी’ कधीच वाईट नव्हती. ‘जीएमसी’ने गोंयकारांना आधार, धीर आणि मदतीचा हात दिला. जेव्हा इतर राज्यातील लोक आमच्याकडे हे आहे ते आहे म्हणायचे, त्यावेळी आम्ही अभिमानाने म्हणायचो ‘आमच्याकडे ‘जीएमसी’ आहे.’ ‘जीएमसी’ गरिबांसाठीच मर्यादित राहिली नव्हती, तर श्रीमंत लोक, आमदार, मंत्रीसुध्दा ‘जीएमसी’चा आधार घ्यायचे. कारण काय, तर उपचाराबद्दलची खात्री आणि विश्वासाहर्ता. पण या कोविडने ‘जीएमसी’चं वाभाडंच काढलं. देशातच नव्हे, तर जगभर ‘जीएमसी’चं हसं झालं आहे. उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश गोमंतपुत्र अँड. सोनक यांना तर न्यायालयात बोलता बोलता हुंदकाच लागला. जवळ जवळ 20 मिनिटे न्यायालयात शांतता पसरली होती. गोंयकार असल्याने हे दरदिवशीचे मृत्यू त्यालाही बघवत नाहीत. एका झटक्यात ‘जीएमसी’ची विश्वासाहर्ता खाली आली. ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ असं म्हणावं लागतंय.

हेही वाचाः मुख्यमंत्री सावंतांना भरपाई देण्यात नाही, कमिशन घेण्यात रस

अमानवी प्रकार

‘आँक्सिजन’अभावी ‘जीएमसी’त रुग्ण मरतात आणि ते ही पहाटे 2 ते 6 या वेळेत आँक्सिजन पुरवठा खंडीत होतो. किंवा उपलब्ध नाही आणि हे सर्वांना माहीत असूनही? ही खबरच ह्रदयाची पिळवणूक करणारी आहे. आणि न्यायालयाने ताकीद देऊन सांगण्यापूर्वी कुणालाच या मरणांचं सोयर सुतकही नव्हतं, हा अमानवी प्रकार आहे. सध्या कोविड आहे म्हणून हे भांडं फुटलं. पण कोविडपूर्वी असे कित्येक रुग्ण आँक्सिजन अभावी मृत झालेले असू शकतात आणि किती वर्षांपासून हे चालू असेल कुणास ठाऊक. हे आठवल्यावरच अंगावर काटा येतो.

हेही वाचाः भाजप सरकारचा ‘घोटाळ्यात घोटाळा’

दोन वर्षापूर्वीही आँक्सिजन अभावी बाबांचा मृत्यू..

2018 चा दिवाळीचा दिवस. आम्हा देसाई कुटुंबियांसाठी काळाकुट्ट ठरला. या दिवशी आमच्या बाबांचं ‘जीएमसी’मध्ये पहाटे 3.15 वा. निधन झालं. बाबांना आम्ही कधीच अंथरूणावर आजारी पाहिलं नाही. 75 ओलांडून 80 कडे पोहचले तरी कधी वाकून चालले नाहीत. स्वतः चालत जाऊन पेपर आणि इतर आवश्यक वस्तू आणायचे. 2018च्या दिवाळीच्या आदल्या दिवशी बाबांचा श्वास अचानक गुदमरायला लागला. म्हणून डॉ. प्रणय बुडकुलेंकडे घेऊन गेलो. त्यांनी सांगितलं साखळी हॉस्पिटलमधून ‘जीएमसी’त  न्यावं लागेल. साखळी हॉस्पिटलमध्ये त्यांना श्वास वाढण्यासाठी ऑक्सिजन दिली. श्वास ठीक झाला. आम्ही बाबांना स्वतःच्या कारने ‘जीएमसी’त घेऊन गेलो. जाताना बाबांनी आमच्याशी चांगल्या  गप्पाही मारल्या. ‘जीएमसी’मध्ये वरच्या मजल्यावर स्वतः पायऱ्या चालत आमच्याबरोबर गेले. तिथे तपासल्यानंतर डॉक्टरांनी ऑक्सिजन लेव्हल कमी होत असल्यानं एडमिट करायला सांगितलं.
एडमिट करताना बाबांनी नर्सला विचारलं, ‘किती दिवस थांबावं लागणार?’  
नर्स म्हणाली, ‘आत्ताच तर आलात. बघू…’
बाबा म्हणाले, ‘उद्या दिवाळी आहे ना म्हणून विचारलं.’
बाबांनी येताना आपल्या नातवंडांनाही रात्री कंदील लावा अशी सूचना केली होती. नंतर बाबा ‘जीएमसी’मध्ये स्वतःच टॉयलेट जाऊन आले. स्वतःच्या हातांनी बिस्कीट खाऊन पाणीही प्यायले. रात्री बाबा खाटेवर झोपले आणि आम्ही दोघे भाऊ बाबांच्या खाटे खाली बसूनच डुलक्या घेत होतो. झोप काही येत नव्हती. अधुनमधुन बाबांकडे बघायचो. दिवाळीच्या दिवशी पहाटे 3.15 वा. डुलक्या घेता घेता आम्ही दोघेही भानावर आलो, तर बाबांची हालचाल बंद दिसून आली. डॉक्टरना कळवलं तसं डॉक्टर आले, तपासले आणि म्हणाले ऑक्सिजन अभावी ह्रदयक्रिया बंद पडली. बाबांना ऑक्सिजनची आवश्यकता होती, मग का लावलं नाही?  या प्रश्नाचं उत्तर आज सापडलं. कोविडमुळे माणसं मरत आहेत. कारण ‘जीएमसी’ मध्ये पहाटे 2 ते 6 ऑक्सिजनचा पुरवठाच होत नाही.

हेही वाचाः एम.वी.आर कंपनीच्या कंत्राटदारने दिली टांग

कोविडपूर्वी बाबांप्रमाणे किती जणांचे प्राण या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे गेले असतील? आणि ‘जीएमसी’मध्ये याची कल्पना सगळ्यांना होती तरीही? सगळंच भयानक… अंगावर काटा उभं करणारे….

चंद्रशेखर य. देसाई, साखळी-गोवा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!