3 रुपयांच्या तिकीटावर 3 कोटींचा व्यवसाय !

'अशी ही बनवाबनवी' ची जादू 33 वर्षांनंतरही कायम !

Goan Varta Live | प्रतिनिधी

3 रुपयांच्या तिकीटावर 3 कोटींचा व्यवसाय करणारा “अशी ही बनवाबनवी” आज तेहत्तीशीत पोहचला ! 23 सप्टेंबर 1988. आजच्या दिवशीच हा चित्रपट प्रसिद्ध झाला आणि एका इतिहासाची नोंद झाली. अनेकदा लढाया करणाऱ्या योद्धांना माहित नसतं आपण जे करतोय ते इतकं मोठ्ठं आहे की त्याची नोंद पुढे इतिहासात घेतली जाईल. काहीस असंच काम “बनवाबनवी”च्या सर्व लोकांनी करुन दाखवलं. आज या पिक्चरला 33 वर्ष पुर्ण झाली. तरीही अजुन ना लिंबू कलरच्या साडीचा रंग उतरला ना सत्तर रुपये जिवंत झाले !!..

…हे शब्द आहेत प्रसिद्ध अभिनेते सचिन यांचे..’अशी ही बनवाबनवी’ ला आज 33 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोशल मीडियावर त्यांनी केलेली ही कमेंट…

बहुतेक जणांचा तो अख्खा चित्रपट पाठच असेल. आजच्या सोशल मीडियाच्या जगात त्यावरचे मीम्सही अनेकदा व्हायरल होतात.‘आणि या मिसेस बालगंधर्व’ हा या चित्रपटातला डायलॉग ऐकून आणि पाहून तुम्ही अनेकदा खळखळून हसला असाल. तोच या चित्रपटाचा ‘टर्निंग पॉइंट’ आहे. तो प्रसंग पु. ल. देशपांडे यांनी अनुभवलेल्या एका खऱ्या प्रसंगावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी त्याबद्दल सांगितलेली ही आठवण…
…………….


बालगंधर्व रंगमंदिराशी माझा पहिला संबंध आला, तो १९७२ साली, ‘शिकार’ या नाटकात मी काम करत असताना. पुण्यातलं प्रशस्त, आलिशान आणि ग्लॅमरस असं नाट्यगृह, अशी तेव्हा या रंगमंदिराची ख्याती होती. पुण्यात तेव्हा रहदारी फारशी नव्हती आणि या नाट्यगृहाचा परिसरही भरपूर होता. त्यामुळे तिथे खेळायला, बागडायलाही मिळायचं. त्या काळातल्या इतर नाट्यगृहांच्या तुलनेत इथे भरपूर सोयीसुविधा होत्या. त्यामुळे नाटकाचे प्रयोग करताना हुरूप यायचा आणि प्रयोग रंगायचा. मी तेव्हा जेमतेम चौदा वर्षांचा असेन. त्यामुळे कलाकार म्हणून माझ्यासाठी या गोष्टी उत्साह वाढवणाऱ्या होत्या. त्या वेळी नाट्यगृहाच्याच आवारातल्या वसतिगृहात प्रयोगाच्या वेळी मी राहतही असे. ‘शिकार’नंतर मी नाटक करू शकलो नाही, त्यामुळे या नाट्यगृहाशी नियमित संबंध आला नाही. परंतु १९८५ नंतर मी म्युझिकल शोज सुरू केल्यानंतर पुन्हा या ठिकाणच्या भेटी वाढल्या. या नाट्यगृहातले माझे शोजसुद्धा चांगलेच रंगले.

त्यानंतर पुन्हा ‘बालगंधर्व’शी संबंध आला, तो तेवढ्याच महत्त्वाच्या आणि अविस्मरणीय अशा गोष्टीसाठी. ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाची कथा माझ्या डोक्यात आली होती आणि ती मी व्ही. शांतारामबापूंना ऐकवली, तेव्हा चित्रपटातला टर्निंग पॉइंट असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा प्रसंग मी त्यांना आवर्जून ऐकवला होता. घराची गरज म्हणून दोन पुरुष बाईचं रूप घेताना दाखवायचं असलं, तरी या कलाकृतीला बालगंधर्वांच्या वेषांतरासारखा उच्च दर्जा असावा, असा माझा आग्रह होता.

या चित्रपटात अशोक सराफ बालगंधर्व रंगमंदिरात जातो आणि तिथे बालगंधर्व आणि त्यांचं स्त्रीरूप यांची शेजारी शेजारी असलेली चित्रं बघून त्याला आपल्या मित्रांना बाई बनविण्याची कल्पना सुचते, असा तो प्रसंग होता. वसंतराव सबनीसांशी पटकथा लिहिण्याच्या आधी चर्चा झाली, तेव्हाही लक्ष्याचं डोहाळजेवण आणि हा बालगंधर्व रंगमंदिरातला प्रसंग, या दोन दृश्यांच्या बाबतीत मी माझा आग्रह स्पष्ट केला होता. त्यांनीही त्याला अनुसरूनच पटकथा लिहिली.

पु. ल. देशपांडेंचा माझ्यावर जीव होता. मी त्यांना अनेकदा भेटायचो आणि ते गप्पांमध्ये अनेक किस्से ऐकवायचे. एकदा त्यांनीच किस्सा सांगितला, की ते त्यांच्या काही पाहुण्यांना नव्यानेच बांधलेलं बालगंधर्व रंगमंदिर दाखवायला घेऊन गेले होते. तिथल्या कर्मचाऱ्याला ‘पुलं’ कोण हे माहीत नव्हतं आणि बालगंधर्व कोण, हे तर माहीत असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यानं ‘पुलं’ना आणि पाहुण्यांना उत्साहाने नाट्यगृह आतून दाखवलं आणि ते सगळे बालगंधर्वांच्या चित्रांपाशी आले. ‘पुलं’ना डावीकडचा मूळ वेशातला बालगंधर्वांचा फोटो दाखवून तो म्हणाला, ‘हे बालगंधर्व.’ मग शेजारच्या बाईच्या वेशातल्या बालगंधर्वांकडे बघून म्हणाला, ‘आणि या मिसेस बालगंधर्व.’

‘पुलं’चा हा किस्सा माझ्या डोक्यात होता. ‘बनवाबनवी’मध्ये मी तो सुशांत रे याच्या तोंडी माझ्या पद्धतीने वापरला. आपल्या आयुष्यात घडलेल्या, पाहिलेल्या गोष्टी नंतर चांगल्या प्रकारे उपयोगी येतात, त्या अशा. बालगंधर्व रंगमंदिर माझ्यासाठी अशा तऱ्हेनं या चित्रपटासाठी मोलाचं ठरलं. हा चित्रपट प्रदर्शित झाला, ते वर्ष बालगंधर्वांच्या जन्मशताब्दीचं होतं, हा आणखी एक अनोखा योगायोग. ‘अशी ही बनवाबनवी’ला जो दर्जा मिळाला, तो बालगंधर्व रंगमंदिर आणि तिथे असलेल्या बालगंधर्वांच्या त्या दोन चित्रांमुळेच, असं मला वाटतं.

(शब्दांकन : अभिजित पेंढारकर)

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!