BLOG | तुम्ही पण विकृत मानसिकतेचे आहात का?

मानसिक युद्धात जिंकायचंय,तर व्यवस्थित झोप घेणं, झेपेल असा व्यायाम आणि सकारात्मक विचार करणं हे उत्तम उपाय

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः जेव्हा नेटफ्लिक्सचा सीईओ मानवी झोपेला त्याचा सर्वात मोठा स्पर्धक मानतो यावरूनच मानवी जीवनात झोपेचं महत्व अधोरेखित होतं. गेलेलं दशक हे माध्यमांच होतं, कधीच विचार न केलेल्या प्रकारचं मनोरंजन २४ तास आपल्या सोबत राहू लागलं.

आपल्या मेंदूमध्ये न मावेल एवढी माहिती त्याच्यावर आदळायला सुरुवात झाली. या माहितीला प्रोसेस करण्यासाठी मेंदू तयारच नव्हता. नेटफ्लिक्स भारतात २०१६ पासून सुरू झालं. भारतात जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्यानं जगातील नामांकित कपन्यांनी भारतीय लोकांसाठी मनोरंजाचे कार्यक्रम बनवायला सुरुवात केली, जे मानवी मेंदूसाठी प्रमाणाबाहेर होतं. जसं हाय कॅलरिजवालं अन्न खाऊन लठ्ठपणा वाढतो, तसंच अति प्रमाणात इन्फॉर्मेशन कॅलरिज खाऊन मेंदूवर चरबी चढते. कारण एवढी माहिती मेंदू पचवू शकत नाही. बिंज इटिंग प्रमाणे बिंज वॉचिंगने शरीराची आणि मनाची वाट लावायला सुरवात केली. भारतीयांनी दिवस आणि रात्र स्क्रीनवर घालवायला सुरुवात केली. झोपेविना रात्री आणि झोपाळू दिवस यांना सहन करण्यासाठी म्हणजे तरतरीत राहण्यासाठी कॉफी, चहा, दारू, तंबाखू, सिगरेट, पान मसाला, गुटखा आणि आणखी असेच पदार्थ खाण्यात वाढले. ही व्यसनं आणि त्यातून येणारे शारिरीक आणि मानसिक आजारही वाढले, औद्योगिक राष्ट्र म्हणून प्रगती करणारा आपला देश हळूहळू आजारी देश बनत चालला.

हे सगळे त्रस्त मेंदू अनेक बदमाश लोकांसाठी लवकर पटणारी ग्राहक होती. कुठल्याही औदयोगिक देशातील कामगारांप्रमाणे भारतातील वर्किंग क्लास पाशी पैसा होता. पण सोबतीला कामाचा ताण, कर्जाचे हफ्ते, नात्यातील चढ-उतार असे त्रास पण होतेच. इंटरनेटने या सगळ्या त्रासलेल्या मेंदूना एक सोपा मार्ग दिला, जेणेकरून रोजच्या जगण्यातून दोन घटका करमणूक पण होईल, ताण हलका होईल आणि कुणाला कळणार पण नाही. खोटी ओळख निर्माण करून काहीही केलेलं कुणालाच कळणार नव्हतं. मात्र इंटरनेट हेच सगळ्यात मोठं व्यसन ठरलं. सोशल मीडिया, पॉर्न, गेमिंग, ऑनलाइन डेटिंग या सगळ्यातून मेंदूत आनंदाचं रसायन डोपामाईन निर्माण होतं, जे लोक मनाने कमकुवत असतात ते रसायन परत परत मिळवण्यासाठी या आभासी दुनियेत हरवून आनंद शोधत व्यसनी होतात.

हे सगळं सुरू असताना अनेक हुशार मेंदू इंटरनेट वापरणाऱ्यांच्या वागणुकीवर लक्ष ठेवून होते. जे लोक दुसऱ्यांना त्रास देऊन आनंद मिळवितात, त्यांना त्या कामाचे पैसे मिळाले. अशांसाठी तर सायबर बुलिंग, ट्रोलिंग हे आवडते उद्योग ठरले. सोशल मीडियावर अशी असंख्य तोल गेलेली टाळकी कामाला आहेत, जी द्वेष आणि दुजाभाव पसरवण्याचं काम आनंदाने करतात. कारण असं काम त्यांच्या मनाला आनंद देतं.

या लोकांचे गट आहेत,

-पैसे घेऊन खरी ओळख दाखवून करणारे
-खरी ओळख न दाखवता आणि पैसे न घेता करणारे
-पैसे घेऊन खरी ओळख न दाखवता करणारे

अचानकपणे एवढी राष्ट्रभक्ती कुठून आली? लोक वेड्यासारखे एकमेकाशी भांडायला का लागलेत? आमच्या सारखा विचार नाही केला तर तुम्ही आमचे दुष्मन ही भाषा का ऐकू येत आहे? यातील लोकांना वेगळेच मानसिक त्रास आहेत. पण त्यावर उपाय न करता लोकांचं इंटरनेटवर येऊन भडास काढणं सुरू आहे. गेल्या काही वर्षात बलात्कार आणि शारीरिक हिंसा प्रचंड वाढली आहे. भाषा सुद्धा हिंसक आहे, काव्य, सोज्वळपणा, साधेपणा हद्दपार झाला आहे. आयुष्य एक क्राईम थ्रिलर असल्यासारखं लोक एकमेकांवर उगीच संशय घेत भांडण ओढवून घेत आहेत, नाती तुटत आहेत.

गेल्या ६ महिन्यातील घटना बघितल्या, तर असं जाणवतंय की लोक हिंसा बघून आनंदी होतायत किंवा त्यांना त्याचं काहीच वाटत नाही आहे. कोणीही सर्वसाधारण मानसिकता असलेली व्यक्ती दुसऱ्यावर हिंसा (शारीरिक आणि मानसिक) सहन करू शकत नाही आणि बघूही शकत नाही. पण नेटफ्लिक्स, प्राईम सारख्या लोकांनी हिंसेचा आणि लैगिंक विकृतीचं सुपरमार्केट उघडून ठेवलं आहे. त्याच्या सोबतीला बाकीच्या विकृत गोष्टी आहेतच.

हे अनैसर्गिक आणि अमानवीय वर्तन हे अचानक आलं नाही. वेगवेगळे न्यूज चॅनेल्स ज्या पद्धतीने ब्रेकिंग न्यूज दाखवतात, त्या अवैज्ञानिक आहेत. मानवी मेंदू विचार करायला वेळ घेतो. मेंदूतील भावनिक केंद्र ज्याला amygdala म्हणतात, ते आपल्या मानवी उत्क्रांतीची देणगी आहे. amygdala हे भीतीवर काम करतं आणि कॉर्टेक्स हा मेंदूतील भाग तर्कशुद्ध विचार करतो. Amygdala ला भीती जाणवली (मानसिक किंवा शारीरिक) तर तो शरीराला संदेश देतो, की आता स्वतःचं रक्षण करायला हवं. मग त्यानुसार मानवी शरीर एक तर त्या भीती वाटणाऱ्यापासून दूर जातं, किंवा भीती वाटणाऱ्याशी दोन हात करायला सज्ज होत, याला flight/fight असं नाव आहे. शरीर या भय अवस्थेत ताण अनुभवत असतं. ब्रेकिंग न्यूज मनात भीतीची भावना सतत जागृत ठेवतात. तार्किक विचार करायला मेंदूला वेळच मिळत नाही. कारण 24*7 वेगवेगळी माध्यमं आणि त्यातून येणारी अखंड माहिती मेंदूत ट्रॅफिक जॅम करते. हे सगळं खूप कठीण आहे. पण आपण सगळेच यातून जात आहोत. या सगळ्या गोष्टी माणसातील पशुला जागं करण्याचं काम करतात आणि तो पशु शांत करणं जवळजवळ अशक्य आहे.

सगळ्यांची डोकी जाणूनबुजून ‘तापवली’ गेली आहेत, तेव्हा सारासार विचार करणं कठीण आहे, पण अशक्य नाही. मेंदूवर किती ताण द्यायचा आणि किती माहिती वाचायची आणि तिची शहानिशा करूनच पुढे जायचं हे आपल्या हातात आहे. समोरच्याने कितीही घाण बोललं, पण लगेच उत्तर देणं, पोस्ट अपलोड करणं, त्यापेक्षा घाण बोलणं हे अविचारीपणाच लक्षण आहे. हे एक मानसिक युद्ध आहे, यात जिंकायचं असेल तर हिंसा, लैगिंक विकृती असलेल्या गोष्टी न बघणं, रोज 7-8 तास झोप घेणं, झेपेल असा व्यायाम आणि सकारात्मक विचार करणं हे उपाय आहेत.

दुसऱ्याला कसलाही प्रकारचा त्रास देणारा कुणीच खुश आणि आरोग्यदायी राहूच शकत नाही. तुम्ही पण विकृत मानसिकतेचे आहात का? याचा नीट विचार करा आणि जबाबदारीने वागा.

डॉ. वृषाली रामदास राऊत, औद्योगिक मानसशास्त्रज्ञ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!