हँड ऑफ गॉड

दिपक पाटील यांचा खास लेख

Goan Varta Live | प्रतिनिधी

१९८० च्या दशकात अर्जेंटिनाच्या मॅराडोना या मिडफिल्डरची फुटबॉल मैदानावर काय दहशत होती. याचा अंदाज घ्यायचा असेल तर १९८६ च्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात एकट्या मॅराडोनाला रोखण्यासाठी बेल्जीयमच्या ६ डिफेंडर्सनी केलेले कडे खालील छायाचित्रात पहा.

दिएगो मॅराडोनाकडे पेलेसारखी गोलिंग एबिलिटी, झिदानसारखी ताकद, बेकहॅमसारखी मिडफिल्डमधील नजाकत, रोनाल्डो-मेसीसारखा फिनिशिंग टच नव्हता. त्याने आंतरराष्ट्रीय किंवा क्लब फुटबॉलमध्ये खूप जास्त गोलही केले नव्हते. त्याचा ऑन किंवा ऑफफिल्ड खडूसपणाही लोकांना अजिबात आवडत नव्हता.

तरीही फक्त साडे पाच फूट उंचीच्या या खेळाडूने आपल्यातील निसर्गदत्त कौशल्याने, अविश्वसनीय ड्रिब्लिंग, विजेच्या चपळाईने आणि नेतृत्वगुणाने फूटबॉल या खेळावर सोडलेली छाप अजरामर आहे.

युद्धाप्रमाणेच खेळाच्या मैदानावरही जिंकण्यासाठी प्रसंगी हातचलाखी करण्यात गैर काही नाही म्हणत मॅराडोनाने १९८६ च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात देवाचा हात दाखवत इंग्लंडला पराभूत केले. १९८६ आणि १९९० च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धांचा मॅराडोना अनभिषिक्त सम्राट होता.

१९८६ ची स्पर्धा जिंकल्यानंतर १९९० च्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात मात्र जर्मनीकडून पराभूत झाल्यामुळे मैदानावर ढसाढसा रडून त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. रोनाल्डो-मेसीचा उदय होण्यापूर्वी भारतातील नागरिकांना फुटबॉल खेळाचे शून्य ज्ञान असले तरी त्यांना दोनच खेळाडूंची नावे माहिती होती. ती होती पेले आणि मॅराडोना. इतकेच काय लोकांना मॅराडोना माहित असला तरी तो ज्या देशाचे प्रतिनिधित्व करीत होता, त्या अर्जेंटिना नावाच्या देशाचे नावही अनेक लोकांनी ऐकले नव्हते.

फ़ुटबॉल खेळात १० नंबरची जर्सी सेंटर मिडफिल्डरला मॅराडोनाच्या आधीपासूनही दिली जात होती. परंतु या १० नंबरच्या जर्सीला खरे ग्लॅमर मिळवून दिले ते याच सेंटर मिडफिल्डरने. त्यानंतर फॉरवर्डिंग स्ट्रायकरपेक्षाही १० नंबरचा सेंटर मिडफिल्डर हा खेळाडू महत्वाचा मानला जाऊ लागला. इतकेच काय तर क्रिकेटसारख्या खेळातही संघातील सर्वात प्रमुख खेळाडूला १० नंबरची जर्सी दिली जाऊ लागली.

अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे मॅराडोनाचे क्लब लेव्हल करियर फारसे बहरले नाही तरी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये हा माणूस लिजंड बनला आहे. २०२० हे भयंकर वर्ष क्रीडा विश्वासाठीही अपशकुनी ठरत आहे. महान बास्केटबॉल प्लेयर कोबे ब्रायंटच्या अकाली मृत्यनंतर जगाने हँड ऑफ गॉडही कायमचा गमावला.

  • दीपक ज. पाटील
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!