तुम्ही आहात का पोस्टपार्टम डिप्रेशनचे शिकार?

पोस्टपार्टम डिप्रेशन ही एक अशी समस्या आहे जी अनेक स्त्रियांच्या वाट्याला येते.

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः आई होणं ही जगातील सगळ्यात सुंदर भावना आहे. आई आपल्या बाळाला तिच्या पोटात 9 महिने वाढवते आणि दरम्यान त्याच्यावर संस्कार करते. प्रेग्नन्सी दरम्यान प्रत्येक महिन्यात स्त्रियांमध्ये वेगवेगळे बदल होताना दिसतात. थकवा जाणवतो, कधी उलट्या तर कधी एखादा पदार्थ खाण्याचा मोह होतो. 9 महिने एका जीवाचा सांभाळ करणं हे प्रत्येक स्त्रीसाठी एक आव्हान असतं. 9 महिने बाळाची काळजी घेतल्यावर डिलेव्हरीनंतर स्वतःची काळजी घेणं महत्वाचं असतं. डिलिव्हरीनंतर स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. हार्मोनल, शारीरिक किंवा मानसिक बदलांचं आव्हान स्त्रियांना पेलायचं असतं. स्त्रिया त्यांच्या शारीरिक आरोग्याकडे बऱ्यापैकी लक्ष देतात. पण मानसिक आरोयाग्याला मात्र कुणीही फारसं महत्व देत नाही. मानसिक अस्वस्थता जाणवल्यास आपण कधीही सायकॅट्रीस्टकडे किंवा कॉऊन्सिलर बरोबर कन्सल्ट केल्याचं दिसून येत नाही. म्हणून डिलेव्हरीनंतर बऱ्याच स्त्रिया डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. डिलेव्हरीनंतर येणाऱ्या या डिप्रेशनला ‘पोस्टपार्टम डिप्रेशन’ असं म्हणतात.

आता हे ‘पोस्टपार्टम डिप्रेशन’ म्हणजे काय?

पोस्टपार्टम डिप्रेशन ही एक अशी समस्या आहे जी अनेक स्त्रियांच्या वाट्याला येते. पण त्याबद्दल त्यांना काहीच माहिती नसतं. पोस्टपार्टम डिप्रेशनबद्दल असलेलं अज्ञान अनेकदा आरोग्याला आणि जीवाला मोठा धोका निर्माण करू शकतं. डिलिव्हरीनंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. हार्मोनल बदल आणि आणि ताण यासाठी कारणीभूत असतात. यामुळे त्वचेमध्ये मोठ्या प्रमाणात वाईट बदल घडतो. केससुद्धा झडू लागतात. त्वचेवर स्ट्रेच मार्क्स दिसल्याने बाहेर लोकांमध्ये वावरण्यास लाज वाटते.

‘पोस्टपार्टम डिप्रेशन’ची कारणं

अशी अनेक कारणं आहेत जी पोस्टपार्टम डिप्रेशनला कारणीभूत ठरू शकतात. यात पहिल्या गरोदरपणानंतर किंवा गरोदरपणात डिप्रेशनमध्ये राहणं, कमी वयात आई होणं, गरोदर न राहण्याची इच्छा होणं, जास्त मुलांना जन्म देणं, प्रीमेंस्‍ट्रुअल डिस्‍फोरिक डिस्‍ऑर्डर किंवा डिप्रेशनची हिस्ट्री असणं, कोणाचाच मानसिक आधार नसणं, एकटेपणाची भावना आणि पती पत्नीमध्ये मतभेद असणं यासारख्या कारणांचा समावेश होतो. अशा प्रकारची कारणं गरोदर स्त्रियांमध्ये दिसण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि ही अतिशय चिंतेची बाब असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हार्मोन्स सुद्धा आहेत कारणीभूत

गरोदरपणामध्ये आणि गरोदरपणानंतर निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांचं आणि शारीरिक बदलांचं मूळ हे हार्मोन्स मध्येच सापडतं. डिलिव्हरीनंतर एस्‍ट्रोजन आणि प्रोजेस्‍टेरोन हार्मोनमध्ये कमतरता निर्माण झाल्याससुद्धा पोस्टपार्टम डिप्रेशनची समस्या उद्भवू शकते. थायरॉइड ग्रंथी मधून स्त्रवणारे इतर हार्मोन्ससुद्धा वेगाने कमी होत असतात आणि यामुळे स्त्रीला थकवा येतो, तिची सतत चिडचिड होते आणि आपण डिप्रेशन मध्ये असल्याची भावना तिला सतावत राहते.

कमी झोप आणि चिंता

मूल जन्माला आल्यानंतर त्याचं संगोपन करण्यात स्त्रिया व्यस्त होतात. याशिवाय जन्मांनंतर बाळ दूध पिण्यासाठी रात्रीचं कधीही उठतं. कारण हाच तो काळ असतो ज्यात बाळ हे पूर्णपणे आईच्या दुधावर अवलंबून असतं आणि जोवर त्याला दूध मिळत नाही तोवर बाळ शांत होत नाही. मात्र अनेक स्त्रियांना यामुळे त्रास होऊ शकतो. कारण या गोष्टीमुळे सतत झोपमोड होते आणि झोप पूर्ण होत नाही. झोप जर जास्त दिवस सतत पूर्ण झाली नाही तर त्यामुळे पुढे ताण तणाव वाढून डिप्रेशन निर्माण होतं. अनेकदा स्त्रियांना बाळाच्या संगोपनाबद्दल सतत चिंता भासत असते. जर हि चिंता वेळीच नियंत्रणात आणली नाही तर त्यातून डिप्रेशन निर्माण होऊ शकतं.

तिची काळजी घ्या

जर या आजाराचं सुरुवातीचं लक्षण दिसलं, तर त्यासाठी औषधांची गरज नसते. पण जर ही लक्षणं वाढत गेली तर मात्र त्या महिलेला मनोचिकित्सकाडे नेण्याची गरज असते. महिलांना या डिप्रेशनपासून वाचविण्यासाठी, त्यांची काळजी घ्या, प्रसूतीनंतर महिलांमध्ये काही शारीरिक आणि मानसिक बदल घडत असतात. अशात मग त्यांना एक चांगली आई होण्याचा दबाव न टाकता, तिची मदत करा. तिला आधार द्या. तसंच मेडिकेशन आणि औषधी सोबतच समुपदेशनदेखील गरजेचं आहे.

उपचार

पोस्टपार्टम मानसिक आजारांवर उपचार करणं अत्यावश्यक आहे. कारण योग्य वेळी उपचार न झाल्याने त्या बाळाच्या वाट्याला दुर्लक्ष, अवहेलना येण्याची शक्यता असते. अशी लहान मुलं पुढे मोठी झाल्यानंतर एकलकोंडी, बुजरी होणं, अभ्यास आणि इतर स्पर्धेत मागे पडण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणजे नवजात मातांकडे कुटुंबातील नवरा, आई-वडील, सासू-सासरे यांनी पुरेसं लक्ष देणं, त्यांना समजून घेणं आणि पाठिंबा देणं गरजेचं असतं. पुरुषांमध्ये आर्थिक ओढाताण, करिअरमधील आव्हानं आणि पत्नीचा पुरेसा वेळ वाट्याला न येणं यातून पोस्टपार्टम आजारांची लक्षणं दिसतात. मात्र त्यांचं प्रमाण कमी आहे किंवा ते समोर येत नाही, असं म्हणता येईल.

पोस्टपार्टम डिप्रेशनवरील प्रभावी उपाय :

नियमित व्यायाम करणं, मेडिटेशन वा योग करणं, सकस आहार घेणं, आपल्या आवडीच्या व्यक्ती बरोबर वेळ घालवणं, मद्यपान व धुम्रपान न करणं, पुरेशी झोप घेणं इ. करता येतं.

पोस्टपार्टम सायकॉसिस

पोस्टपार्टम सायकॉसिसमध्ये आईला आलेले नैराश्य हे टोकाचं असतं. त्यामुळे ती स्वत:ला किंवा बाळाला इजा पोहोचवण्याचं, काही प्रमाणात आत्महत्या करण्याचं, बाळाला मारण्याचे प्रयत्न करते. बाळ नकोसं वाटणं, त्याला जवळ न घेणं, त्याला स्तनपान करण्याची इच्छा न होणं किंवा काही टोकाच्या प्रसंगी बाळाला फेकून द्यावंसं वाटणं अशी लक्षणं आईमध्ये दिसतात. आपण चांगली आई होऊ शकत नाही, ही भावना ही त्याचाच एक भाग असते. अशी लक्षणं दिसून येणाऱ्या महिलांनी त्वरित मानसोपचारतज्ज्ञांना भेटून उपचार सुरू करणं गरजेचं आहे. या आजारामध्ये काही विशिष्ट औषधांचे उपचार देत असल्यास बाळाला स्तनपान करणं बंद करावं लागतं. पण या औषधोपचारांचे कोणतेही गंभीर परिणाम होत नाहीत. तेव्हा प्रसूतीच्या काळात किंवा बाळाचं संगोपन करताना येणाऱ्या मानसिक तणावाकडे दुर्लक्ष केलं जातं. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये खचून न जाता तात्काळ उपचार घेऊन पूर्ववत आयुष्य जगणं शक्य आहे हे प्रत्येक महिलेने लक्षात घ्यायला हवं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!