‘पाशवी अत्याचार’ म्हणण्याअगोदर वाचावी अशी गोष्ट…

Goan Varta Live | प्रतिनिधी
- समीर गायकवाड
म्हशीवर हाल्या वा गायीवर घुळी चढवणे ही गुरांच्या रेतनाची एक क्रिया आहे जी खेड्यांनी अजूनही गावातल्या वेशीपाशी वा पाराजवळ नजरेस पडते. गाय, म्हैस गरमीवर आल्यावर योग्य नर शोधून ही क्रिया पार पाडली जाते. प्रसंगी यात पशुपालक गायी, म्हशींवर जोर देतात वा त्यांच्यावर जबरदस्तीने नराला रत व्हायला लावतात. प्राण्यांच्या जगात जिथंवर माणसांचा हस्तक्षेप आहे तिथं नर मादी रत होण्याच्या क्रियेत माणूस आपला स्वार्थ वा आपल्या भावना त्यात गुंतवतोच.
एरव्ही आपल्यापैकी अनेकांनी भाद्रपदात कित्येकदा पाहिले असेलच की रस्त्यावरून जाणाऱ्या कुत्रीच्या मागे अनेक कुत्रे लागलेले असतात. तब्बल चारेक दिवस ते तिला अक्षरशः भंडावून सोडतात, मात्र तिच्या मर्जीशिवाय कुत्रा तिच्याशी रत होऊ शकत नाही.
प्राणी असो वा पक्षी, मादीच ठरवते…
जंगलात देखील अगदी हिंस्त्र समजले जाणारे वाघ, सिंह, कोल्हे, लांडगे देखील आपल्या मादीच्या मर्जीशिवाय तिच्याशी कामक्रिडा करू शकत नाहीत. कामक्रीडेसाठी कोणत्या नरास जोडीदार म्हणून पसंती द्यायची हे मादी ठरवते. हरिणी असो वा हत्तीण, नराला तिला रिझवावे लागतेच.
हाच नियम पक्षांच्या जगात लागू होतो. मादीच्या इच्छेनुसारच नर तिच्या सहवासात येतो. जलविश्वातदेखील मादी माशाच्या मर्जीलाच प्राधान्य आहे, नर मासे तिच्याभवती हुळहुळत राहतात, ती ज्याला पसंती देते तोच तिच्या देहावर स्वार होतो.
विश्वातील प्राणी जगतात मादीच्या मर्जीशिवाय नर तिच्याशी रत होऊ शकत नाही याला एखाददुसरा शास्त्रीय अपवाद असू शकेल.
मात्र स्वतःचा मेंदू अतिप्रगत, विकसित आणि विचारशील असल्याच्या बतावण्या करणाऱ्या माणसाचं मात्र असं नाही. तो बेगुमानपणे जी बाई आवडते तिला चुरगाळतो. नर असल्याचा कमालीचा पुरुषी अहंकार आणि त्वेष त्याच्यात ठासून भरलाय. त्या जोरावर तो स्त्रीचे वय, शारीरिक अवस्था, तिची इच्छा मर्जी यांचा तीळमात्र विचार न करता निव्वळ लिंगपिसाट होऊन गेलाय आणि तरीही काही मंडळी हे मान्य करायला तयार नाहीत.
कुठे जात आहोत आपण..?
खऱ्या अर्थाने पशू आपण आहोत. कारण भेदाभेद करण्याच्या अनेक पायऱ्या आपण निर्माण केल्या आहेत. शोषण करण्यासाठी सोप्या ठरणाऱ्या वर्गवारीच्या उतरंडी फक्त आणि फक्त मनुष्य प्राण्यात पाहता येतात. कथित डिजिटल युगात हा भेद अधिक हिणकस आणि जोरकस झाला आहे हे आताशा ठळकपणे अधोरेखित होऊ लागलेय.
मानवी संस्कृतीचे हे अधःपतन प्रत्येकावर कधी न कधी परिणाम करणार आहे. त्यामुळे आज कुणाला या अवस्थेतही हर्षोन्माद होत असेल, तर तो तात्कालिक काही वर्षांचा वा दशकांचा असेल. त्यानंतर उरतील ते केवळ आणि केवळ भोग !