लग्नात मुलगी मोठी असली तर काय बिघडले ?

आम्ही मुलीला प्रगती करायला देतो का?

Goan Varta Live | प्रतिनिधी

भारतीय समाज हा विविध रुढी परंपरेच्या धाग्याने विणलेला एक रेशमी कपडा आहे. गेली कित्येक वर्षे हा समाज रेशमाच्या अतूट बंधनात गुंतलेला असल्याचा भाव पावला पावलावर होत असतो. आपल्या भारतात विविध धर्म, हजारो संस्कृती,अगणित भाषा आणि लाखो खाद्य संस्कृतिने व्यापलेला देश आहे. पराक्रमी इतिहास असलेला आपला देश रीतिरिवाज घेऊन आजपर्यंत चालत आहे. आपल्या भारतात हजारो रिती आहेत ज्या हिताच्या आहेत हे मान्य करावे लागलेले पण काळाच्या जलप्रवाह वाहत असताना काही रिती काळाच्या ओघात लुप्त केल्या तर त्यात काय गैर आहे ? काळाबरोबर आपले विचार आणि भावना बदलायला नको का? किती दिवस त्या जुन्या रितीच्या खाली भरडले जाणार आहोत आपण ? असे अगणित प्रश्न प्रत्येक तरुणाच्या, प्रत्येक युवक युवतीच्या मनाच्या कोपऱ्यात सुई सारखे टोचत आहेत.

आपल्या देशात “लग्न” या धार्मिक विधीचे विशेष महत्त्व आहे. लग्नाला आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. लग्न म्हणजे दोन जीवाचे मिलन. अत्यंत समृद्ध अशी लग्न परंपरा आपल्या देशात आहे याचा विशेष अभिमान आहे. पण कालांतराने लग्न या परंपरेने वेगळे वळण घेतले आहे.लग्न म्हणजे हजारो रीतिरिवाज आणि हास्यास्पद नियम. लग्नाचे स्थळ बघण्यापासून ते त्या जोडप्याच्या मुलाच्या नामकरणविधी पर्यंत किमान शंभर रिती असतील.या लग्न विधितील नियमांचा विचार न केलेलाच बरा.पण एक गोष्ट माझ्या मनाला अस्थिर करते ती म्हणजे लग्नाची वय मर्यादा.

आपल्या देशात एक विचित्र नियम आहे तो म्हणजे “वरापेक्षा वधू किमान काही दिवस लहान असावी” हे ऐकल्यावर माझ्या मनातले हसू आवरत नाही. पण त्या नंतर अनेक प्रश्न उत्पन्न होतात की हा कसला नियम? कोणी आणि कशासाठी केला हा नियम ? वधू वरापेक्षा लहानच का असावी ? पण या प्रश्नाचे उत्तर कुठेच सापडत नाही. पसतीशी उलटलेला मुलगा विसवर्षिय मुलीशी लग्न करू शकतो पण तीस वर्षाच्या मुलगी एकोणतीस वर्षांच्या मुलाशी लग्न करू नये. हा कुठला नियम ? मुलं काहीही करू शकतात पण मुलींनी नियम पाळावेत.असे का? पण एक प्रश्न माझ्या मनाला अस्थिर करतो तो म्हणजे, मुलगी मोठी असली तर काय बिघडले? मुलगी आपल्या हिताचा विचार करू शकत नाही का? एखाद्या मुलीला आपल्यापेक्षा कमी वयाचा मुलगा आवडला तर तिची काय काय चूक? ती आपल्या आयुष्याचा विचार करू शकत नाही?

आज आम्ही म्हणतो स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे. स्त्री अनेक क्षेत्रात अग्रेसर बनत आहे. आपल्या कलाकृतीत मेहनतीची पावले टाकत स्त्री नाव रुपात येत आहे.’ मुलगी शिकली प्रगती झाली ‘. हे वाक्य आम्ही वारंवार उल्लेखतो पण एखाद्या मुलीला प्रगती करायला देतो का? या प्रश्नाने माझ्या विचारांना विराम दिला. पण माझ्या शेवटच्या प्रश्नाने प्रत्येकाच्या मनात एक नवा प्रश्न उत्पन्न होऊदे जेणेकरून या रिती बदलायला मदत होईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!