…आणि दगडाला आलं देवपण !

श्रावणी सोमवारनिमित्त श्री कुणकेश्वराचं शब्ददर्शन...

Goan Varta Live | प्रतिनिधी

…एरवी त्या दगडावर पाय ठेऊन आम्ही बिनदिक्कतपणे मंदिराच्या आवारात जात असू. त्या गेटवर पाय ठेऊन गप्पागोष्टी करत असू, पण आता तसं करण्यास मन धजत नाही. कारण आता भाविकांच्या श्रद्धेची बेलफुले त्या दगडावर पडत आहेत. त्या लोखंडी गेटवर डोकं टेकवलं जातंय. मंदिर बंदच आहे. आतला माझा कुणकोबा ध्यानमुद्रेत बसला असावा कदाचित. पण त्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या त्या दगडासमोर नतमस्तक होऊन आज कुणकोबाला गार्‍हाणं केलं जातंय. त्याच्यावर भक्तीफुलांची उधळण केली जातेय.

‘टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही’ असं म्हणतात. पण त्या चिर्‍याने कोणतेही घाव न सोसता असं कोणतं पुण्य केलं होतं की कधीकाळी जे लोक त्याला साधं जुमानत ही नव्हते, तेच आज त्याच्यावर बेलफुले अर्पण करुन त्याच्यासमोर लोटांगणं घालत आहेत. प्रश्न श्रद्धेचा आहेच तसा तो भक्तीचा देखील आहे. खरंतर तो ‘बंद गेट’ हा भक्तांच्या व देवाच्या भेटीमधला एक अडसर आहे. पण ही भक्तीच अशी आहे की त्या बंद गेटला हार बांधून कुणकेश्वराला हार अर्पण केल्याचं समाधान भाविक घेतायत. त्या लोखंडी गेटला देवत्व बहाल केलं गेलंय. कुठून येते ही भावना ? एवढी श्रद्धा कुठून निर्माण होते? उत्तर आहे, “तो जो मंदिरात ध्यानस्थ बसलाय ना त्या माझ्या कुणकोबामुळे”.

अगणित ब्रम्हांडे ज्याचा रहीवास…अशी ज्याची आरती गायली गेलीय. जर तो ब्रम्हांड व्यापून आहे मग तो त्या गेटमध्येही आहेच की ! त्या चिर्‍यातही तोच सामावलेला आहे. आमची श्रद्धा तर तिथून सुरु होते जिथून गाडीवरुन घाटी उतरत असताना दुरवरुन समोर कुणकेश्वराचं मंदिर दिसतं. तिथून पहिला नमस्कार घडतो. कधी मंदिराच्या बाजूने गाडी घेऊन जाताना आपल्या गाडीचा हॉर्न वाजतो ना तेव्हा नमस्कार घडतो. हे तुम्ही काही अगदी ठरवून केलेलं नसतं. की आता मंदिराजवळ आपण आलोय मग एक हात छातीला लावून नमस्कार करायला पाहीजे असं काही होत नाही. मंदिराजवळ गाडी आली की कधी आपसूक आपल्या मेंदुकडून अंगठ्याला कमांड पास होते..अन् कधी हॉर्नचं बटण दाबलं जातं ते स्वतःचं स्वतःलाच कळत नाही…सुसाट वेगाने तुम्ही दिवसभराच्या कार्यक्रमाला निघून देखील जाता.

कुणीतरी विचारतं की, गाभार्‍यात जाऊन “श्रीं”चे हात लाऊन दर्शन घ्यावेसे नाही वाटत का? मी म्हणतो, तो कुणकेश्वर या मंदिराच्या रुपाने माझ्यासमोर उभा आहे. मंदिराची ही भव्य वास्तु म्हणजे माझ्या कुणकेश्वराचे विराट रुपच जणू. त्या विराट रुपासमोर नतमस्तक झालात म्हणजे तेच समाधान मिळतं जे गाभार्‍यात जाऊन मिळालं असतं. मग गाभार्‍यात जाऊनच दर्शन घेण्याचा अट्टाहास का करावा?

ज्यांनी ‘कुणकेश्वर’ जाणला, त्यांनी चराचरात पाहीला. मग त्या समुद्रकिनार्‍यावरच्या खडकांवरही तोच आहे. हार बांधलेल्या बंद गेटवरती ही तोच आहे आणि बेल वाहिलेल्या चिर्‍यावरती ही तोच आहे. त्याला भेटायला कुठे कशाला जायला हवं..तोच तर आपल्याला चराचरात भेटत असतो.\ मंदिरात जाताना देखील आपण पहीलं त्याच्या पायरीला नमस्कार करुनच पुढे सरकतो ना? संत नामदेव महाराजांनी समाधीसाठी विठ्ठल मंदिराची पायरीच का निवडली? याचं उत्तर जर तुम्हाला शोधता आलं तर तुम्हाला त्या पायरीचं महत्व कळेल. मग त्या पायरीतही तो आहेच की…

आज श्रावण सुरु झाला. गेल्या वर्षीच्या श्रावणातही मंदिर बंद होतं. त्यावेळेला श्रावणी सोमवारी सवयीप्रमाणे पहाटे उठून प्रवेशद्वारावरुन कुणकेश्वराला नमस्कार केलाच. मध्ये महाशिवरात्रीला तर अवघं कुणकेश्वर तीन दिवस कर्फ्यु लावल्यासारखं होतं. पण तरीही यात्रेला दुकानं नसताना देखील रात्रीचे आम्ही वेड्यासारखे बाजारपेठेपासून ते समुद्रकिनार्‍यापर्यंत फेर्‍या मारुन यात्रेचा फिल घेत होतोच की! तेव्हा कुणकेश्वर आमच्या मनात होता, गेल्या वर्षीच्या यात्रेच्या आठवणीतून रमत होता. आता तो श्रावणातल्या आठवणीतून आम्हाला दिसेल.

आमच्यासाठी श्रावणी सोमवार म्हणजे काय तर भाविकांची होणारी गर्दी..तो रस्त्यावर दरवळणारा भाजलेल्या मक्याच्या कणसाचा वास..मंदिरात आळवलेले मुणगेकर, लोकरे, कासले, हरयाण ई. भजनी बुवांचे ऐकायला मिळणारे संगीत भजन, समुद्रकिनारी बागडणारी कॉलेजची पोरं, भजन आटोपल्यावर हॉटेलात मित्रांसोबत नाष्टा करताना होणारी मजा मस्ती. मिठमुंबरी पुलावरुन चालत येणारे भाविकांचे जथ्थे, आमच्यासाठी श्रावण म्हणजे तो मंदिरात दरवळणारा अगरबत्तीचा सुवास , बेलपत्रांनी शिवामुठींनी झाकून गेलेला कुणकेश्वर, दुग्धाभिषेकात न्हालेला कुणकेश्वर.

आताही मंदिर बंद असलं तरी हा जो मनात भरणारा श्रावणी सोमवार आहे ना तो कधीच रिता राहणार नाही. आमची श्रद्धा तर केव्हाच त्या गेटवरच्या दगडावर बेल फुलं वाहतेय. आमच्यासाठी तोच आमचा देव !

– हेमंत पेडणेकर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!