अमृतमहोत्सवी गोवा क्रांतीदिन

मुक्तपणे बोला, लिहा, विचार करा!

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः डॉ. राममनोहर लोहिया यांनी दि. १८ जून १९४६ रोजी मडगावमध्ये पोर्तुगीज सरकारची नागरी स्वातंत्र्यावरील बंधने झुगारून देत जे ऐतिहासिक भाषण करून गोवा मुक्ती लढ्याचं रणशिंग फुंकलं, त्याचा ज्येष्ठ पत्रकार परेश प्रभू यांनी केलेला हा मराठी अनुवाद…

हेही वाचाः नोकरी शोधताय? ती ही गोव्यात? मग ही बातमी तुमच्यासाठीच!

ही भूमी आणि येथील लोकांना जाणून घेण्याव्यतिरिक्त अन्य उद्देश न ठेवता मी गोव्यात आलो. मी तुमच्याविषयी ऐकलं होतं आणि तुमच्यापैकी काहीजण माझे मित्रही आहात. परकीय सत्तेनं तुमच्यावर आत्महीन संस्कृती लादण्याचा प्रयत्न केला आणि मी असंही ऐकलं की तुम्हाला तुमच्या नागरी हक्कांपासून वंचित ठेवलं गेलं. पण मी जेव्हा तुम्ही कोणत्या प्रकारच्या राजवटीखाली राहता आहात हे प्रत्यक्ष पाहिलं, तेव्हा माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही.

हेही वाचाः सोन्याचा किंमतीत मोठी घसरण, तोळ्याचे नवे दर किती?

लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी मला त्यांच्या दुःखद कहाण्या ऐकवल्या. पोर्तुगीजांनी तुम्हा लोकांमध्ये निर्माण केलेल्या हतबलतेविषयीचा रागही त्यांनी काही वेळा व्यक्त केला. तुम्ही संघटना स्थापन करू शकत नाही. भारतीय राष्ट्रीय काँग्रेससारख्या राजकीय संघटनांविषयी बोलू शकत नाही, अभ्यास किंवा क्रीडाविषयक किंवा ग्रामोद्धारासाठीच्या संघटना स्थापन करण्यासही सरकारची पूर्वपरवानगी लागते आणि पोलिसांच्या नजरेखाली काम करावं लागतं. तुम्ही बैठका घेऊ शकत नाही. राजकीय बैठका सोडाच, सामाजिक आणि खासगी मेळावे घ्यायलाही परवानगी लागते आणि पोलीस चौकशीसाठी येतात. तुम्ही प्रकाशनं काढू शकत नाही. सेन्सॉर तुमची वर्तमानपत्रे मिळमिळीत बनवीत आहे आणि ती तुम्हाला तुम्ही ज्या देशाचा भाग आहात त्याविषयी काहीही सांगत नाहीत. गेली प्रदीर्घ अठरा वर्षं तुम्ही अशा कायद्यांखाली राहिला आहात.

हेही वाचाः ही आजची गर्दी; उद्या तर मुख्य बाजार; उद्या काय?

तुम्हाला नवे गव्हर्नर जनरल मिळाले आहेत. ती खूप आशावादी व्यक्ती असावी असं दिसतं. कारण त्यांनी पोर्तुगालचं गोव्यावरील सार्वभौमत्व कायम राखण्याचा इरादा बोलून दाखवलेला आहे. विशेषतः जिथे जागृत होत चाललेल्या मोठ्या समाजांवर छोट्या विदेशी राजवटींनी सार्वभौमत्व लादलं आहे, अशी सार्वभौमत्वे आज धुळीला मिळत चालली आहेत, अशा या काळात अशा प्रकारचा उद्देश ते बाळगत आहेत हे शौर्यच म्हणायला हवं! खरं तर आधी पोर्तुगालच्या छोट्याशा साम्राज्याने स्वतःचं सार्वभौमत्व सांभाळण्याची आणि त्यांच्या उत्तरेकडच्या शेजार्‍यांनी आणि इतरांनी केलेल्या शिरकावाची चिंता करायला हवी. तरीही पोर्तुगाल गोव्यावर राज्य करीत आहे आणि एवढ्या छोट्या आणि दूरवरच्या राजवटीने माझ्या देशाच्या एका भागावर राज्य करावं हे वास्तव स्वीकारणं मला जड जातं आहे.

हेही वाचाः रस्ता उध्वस्त करून ऐन पावसाळ्यात केबल घालण्याचं काम

ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात येताच पोर्तुगीज सत्ता एक दिवसही टिकणार नाही हे अगदी खरं आहे. ज्यांनी हे स्वातंत्र्य स्वप्रयत्नांती मिळवलेलं असेल, तेच त्याचा लाभ घेऊ शकतील. ज्यांनी त्याची प्रतीक्षा करीत दुःख भोगलेलं असेल, तेच त्याचा आनंद घेऊ शकतील. आज मी तुम्हाला पोर्तुगीज सत्ता उलथवून टाकण्याचं आवाहन करणार नाही. ती वेळ येताच आपल्याआपण नष्ट होईल. ही सभा एका खूप मर्यादित उद्दिष्टासाठी बोलावलेली आहे. हे कायदे जणू अस्तित्वातच नाहीत अशा प्रकारे आपल्याला बोलण्याचं आणि कृती करण्याचं हे निमंत्रण आहे. आपण जरी एकदम आपलं स्वातंत्र्य प्राप्त करू शकणार नसलो, तरी किमान आपण स्वातंत्र्याचा विचार केला पाहिजे आणि त्याविषयी बोललं पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी संघटित शक्ती उभारली पाहिजे. पोतुर्गालचे प्रजासत्ताक विदेशी लोकांवर राज्य केल्यानं बदनाम आहे. विचारांवर नियंत्रण मिळवण्याचे पाशवी कायदे अमलात आणून ते या बदनामीमध्ये भर घालणार आहे काय? हे कायदे गेले पाहिजेत आणि ते लवकरच जातील. जागृत होणार्‍या लोकांना त्यांच्या आत्माविष्काराच्या प्रयत्नांपासून वंचित ठेवलं जाऊ शकत नाही. पोर्तुगालमध्येही मर्यादित नागरी स्वातंत्र्य आहे हा युक्तिवाद होऊ शकत नाही. पोर्तुगीज ज्या कायद्यांखाली राहात आहेत ते तितकंच वाईट आणि घातक आहेत, पण हे त्यांनी विसरू नये की त्यांच्यावर विजय मिळवला गेलेला नाही. जेव्हा विदेशी सत्तेचं जोरदार वजन विचार आणि उच्चार स्वातंत्र्यावर नियंत्रण मिळवतं, तेव्हा माणसाचा आत्मा मृतप्राय होण्याचा धोका संभवतो.

हेही वाचाः एकनाथ महालेंच्या शेतजमिनीत विमानतळाची माती

गोव्याचे रूपांतर साम्राज्यवादी अधिसत्तेच्या बेटामध्ये करण्याचं कटकारस्थान अनेक दशकं सुरू आहे, जिथे कायदा अपुरा भासतो आहे आणि कराचीपासून मुंबई ते गोव्यापर्यंतची वर्तमानपत्रांची संपूर्ण साखळी आणि इतर मंडळी कॅथलिक ख्रिस्तीजनांमध्ये हिंदुस्थानी राष्ट्रीयत्वाविषयीचा अकारण द्वेष आणि भीती पसरवित राहिली आहेत. खासगी आणि सेक्युलर शाळांमधून कॅथलिक मुलांना काढून घेण्याचं आवाहन एका अलीकडच्या परिपत्रकात करण्यात आलं. धार्मिक संस्था वर्चस्व लादणारे पोर्तुगीज आणि वर्चस्वाखाली असलेले गोमंतकीय यांना एकत्र आणून गोमंतकीयांना पोर्तुगालविषयी आणि त्यांच्या गोव्यावरील आक्रमण आणि सत्तेविषयीचा अभिमान वाटावा हे आपलं उद्दिष्ट असल्याचं खुलेआम जाहीर करीत राहिल्या आहेत. अगदी अलीकडेपर्यंत गोवा सरकार ज्या दिवशी गोव्याला पारतंत्र्यात ढकलले गेले त्याचे सोहळे करून लोकांना बोलवीत असे. तुमचे महान नेते मिनेझीस ब्रागांझा यांनी केलेल्या जोरदार निषेधानं सरकार घाबरलं, पण हे निंदनीय सोहळे इतरांनी सुरू ठेवले आहेत. ते गोमंतकीय कॅथलिकांमध्ये अशी भीतीही पसरवीत आहेत की, पोर्तुगीज किंवा ब्रिटीश सत्तेखाली त्यांच्या नोकर्‍या सुरक्षित राहतील आणि भारतीय सत्तेखाली आल्यास असुरक्षितता येईल. गोमंतकीय प्रतिभेवरील हा अविश्वास आहे. जर गोमंतकीय भारतीय जहाजांवर आणि मुंबईतील किंवा कारवार वा कलकत्त्यातील भारतीय कचेर्‍यांत आणि इतरत्र काम करत असतील, तर ती त्यांच्यातील प्रतिभेची बक्षिसी आहे आणि त्यांच्याबाबतीत जात किंवा धर्म यावरून कोणताही भेदभाव केला जात नाही. मुक्त भारतामध्ये प्रतिभेला मान्यता मिळेल आणि जात किंवा धर्मावरून भेदभाव केला जाणार नाही.

हेही वाचाः बेळगावला निघालेली गोव्याची दारू पकडली

अशाप्रकारची भीती जाणीवपूर्वक पसरवण्यामागे एकच उद्दिष्ट असू शकतं ते म्हणजे गोमंतकीयांना राष्ट्रीय जीवनाच्या प्रवाहापासून दूर नेणं. आणि आपण कल्पना करू शकता की त्यात गोमंतक आणि उर्वरित हिंदुस्थानचे किती नुकसान असेल. गोव्याविषयी एखाद्याला खूप कमी माहिती असेल, पण त्याला एवढं तरी नक्कीच माहिती असेल की जिथे मनुष्याचा आवाज दडपणाखाली असतो, त्याची कृती बंधनात असते आणि भीती त्याला गुदरमून टाकत असते, तिथे दैवी आवाज ऐकू येत नसतो…

हेही वाचाः समुद्रकिनाऱ्याच्या भागात भाज्यांची लागवड वाढविण्यासाठी विशेष वेबिनार

‘गोव्यातील हिंदू – त्यांची कठोर परीक्षा घ्या’ अशा प्रकारच्या चर्च पदाधिकार्‍यांच्या शेरेबाजीने गोमंतकीय हिंदूंना चिथावणी दिली जात आहे, तरीही मी त्यांना म्हणेन, ‘आपल्या मार्गामध्ये कोणतेही अडथळे आले आणि आडमार्ग स्वीकारावे लागले, तरी आपल्याला सध्याच्या समान हिंदुस्थानी राष्ट्रीयत्वात मिसळावं लागेल, ज्यात ख्रिस्ती, मुस्लीम आणि हिंदू समान सदस्य असतील. असं चैतन्य परत मिळवा जे भारतीय राष्ट्रीयत्वामध्ये जात किंवा श्रद्धेनुसार फूट पाडण्यास अनुमती देत नाही आणि सर्व भारतीय घरांना शुद्धच मानतं. गोव्यातील हिंदूंमध्ये मोठ्या संख्येने महाराष्ट्रीय वंशाचे लोक आहेत ज्यांच्यामध्ये लोकमान्य टिळक आणि सातारच्या मराठ्यांची गौरवशाली परंपरा सामावलेली आहे. ते स्वातंत्र्याचे नैसर्गिक लढवय्ये आहेत आणि त्यामुळेच हिंदुस्थानी राष्ट्रीयत्वाचे निर्माते आहेत जे जातींनी वेढलेल्या क्षयग्रस्त देशाने घातलेले सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळे उद्ध्वस्त करतील. जिवंतपणा हा जातींचा शत्रू असतो.

हेही वाचाः २१ जून पासून शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती

तुमच्यामध्ये चर्चा चालत असते की मुक्त गोमंतक कर्नाटकचा भाग व्हावा की महाराष्ट्राचा की स्वतंत्र प्रांत बनावा? अशी चर्चा करण्यात काहीही नुकसान नाही जर अशा चर्चा एवढ्या तापणार नसतील की एकत्र काम करण्याची त्यांची क्षमता नाहीशी होईल. गोमंतक उर्वरित हिंदुस्थानप्रमाणे अजून मुक्त व्हायचा आहे आणि मुक्त गोमंतक हा हिंदुस्थानाचा भाग बनणार आहे. ही दोन महान कामं एवढी महत्त्वाची आहेत की सर्व प्रगतीप्रेमी गोमंतकीयांना एका अतूट धाग्यामध्ये बांधून टाकतील, मग प्रत्येकाचं मत काही का असेना. ‘‘कोकणी की मराठी गोमंतकाची भाषा असावी?’’ अशा चर्चा मग करता येतील आणि तुम्हाला सामना कराव्या लागणार्‍या समस्यांवर तुम्हाला चर्चा करण्याची अनुमती नाही या वस्तुस्थितीचंच ते दर्शन असतं. शेवटी कोकणी आणि मराठी या सर्व एकमेकांशी जोडलेल्या भाषा आहेत आणि एकीच्या विकासाने दुसरीचं नुकसान होणारं नाही. गोमंतक त्याच्या शेजार्‍यांहून सुदैवी आहे ज्यांच्या भाषा निश्‍चित आहेत. तो दाक्षिणात्यांसाठी हिंदुस्थानीचे – आपल्या राष्ट्रीय भाषेचं संचित बनू शकतो.

हेही वाचाः ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारे मृत्यू सरकारने गालिच्याखाली लपवले

गोमंतक इतर बाबतींतही सुदैवी आहे. लढाया आणि वेदना व दुःखांचं जे कारण होतं त्याचा लाभदायक गोष्टींसाठी उपयोग करता येण्याजोगा आहे. तुमच्या भूमीमध्ये वैविध्यपूर्ण डोंगररांगा एकमेकांना भेटतात. तुम्ही इतरांपेक्षा चांगल्या ठिकाणी आहात जिथे इतिहासावर प्रेम करणारा आणि तरीही वर्तमानाच्या गरजांचे भान असलेला आणि संयुक्त हिंदुस्थानसाठी समर्पित असलेला नवा भारतीय घडेल. गोवा हा सुंदर प्रदेश आहे. अनेक शक्यतांनी समृद्ध आहे. रेलगाडी डोंगरांतून तुमच्या भूमीत घेऊन येते तेव्हा ते भणाणते वारे आणि ती उंची पाहून आपण थक्क होतो. त्यापासून काय नाही करता येणार? ग्रामोद्योगासाठी विद्युत ऊर्जा त्यापासून मिळवता येईल. प्रत्येक गोमंतकीयाच्या जीवनात त्यातून समृद्धी येईल. विश्रांती आणि सौंदर्यास्वादासाठी दूरदुरून येणार्‍यांना तुमची भूमी निवारा देऊ शकेल. हिंदुस्थानच्या लोकांसाठी ती खर्‍या अर्थाने एकमेकांस भेटण्याचं स्थळ बनेल. मात्र, अमेरिकेतील टेनीसी व्हॅली अथॉरिटी प्रमाणे डोंगर आणि पाणी आणि झाडे आणि माणसं यांना एकत्र आणणं हे तोवर अशक्य असेल जोवर मुक्त माणसं ते काम हाती घेतील. हिंदुस्थान मुक्त होईस्तोवर दुधसागराने आपली ऊर्जा आणि सौंदर्य अर्धे लपवावं. अजून काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही हाती घेतल्या पाहिजेत आणि घेऊ शकता.

हेही वाचाः चोर्ला घाट महामार्गावरून अवजड वाहतुकीला बंदी

ग्रामोद्योग आणि खादीचे पुनरुज्जीवन करायचं आहे आणि नवे उद्योग उभारायचे आहेत. तुम्ही हा तांदळाचा काळाबाजार रोखायला हवा ज्यामुळे सरकार आणि त्यांच्या कर्मचारी व इतरांना जनतेच्या अन्नातून नफा लुटता येतो. गोव्याची ही अर्धभुकेली आणि अर्धनग्न जनता आहे. गोव्यात मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे आणि श्रीमंत व गरीबांतील दरी इतरत्र दिसते तशी मोठी नाही हे खरं आहे, पण अन्यत्र असतात तसे गरीब आणि अति गरीबही येथे आहेत, विशेषतः किनारपट्टीपासून दूरच्या गावांमध्ये भूमीहीन मजूर आहेत, महिला आणि पुरुष वजन वाहून नेत आहेत, रेल्वे मजूर आहेत आणि महिला आणि पुरुष आहेत जे बंदराजवळच्या आणि इतर आस्थापनांजवळच्या छोट्या वस्त्यांत राहात आहेत. त्यांची स्थिती सुधारण्यासाठी काम करणार्‍या सार्वजनिक कार्यकर्त्यांची गरज आहे. आमच्या लोकसंख्येमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांना संघटित करा आणि त्यांची परिस्थिती सुधारण्यास मदत करा. नाही तर आमची लोकसंख्या चाळीस कोटी आहे आणि गोमंतकाची पाच लाख आणि आणखी लाखभर बाहेर आहेत हे सांगण्याचा हे सगळे जागृत नसतील तर काय उपयोग?

हेही वाचाः गोव्याच्या पुर्ननिर्माणासाठी हवी एक चळवळ

देश घडवणारा कार्यक्रम हा गरीबांना आणि अतिगरीबांना जागृत करणारा आणि त्यांची परिस्थिती सुधारणाराही असला पाहिजे आणि गोमंतक हे सहकारी शेतीला चालना देण्यासाठी इतरांपेक्षा चांगले ठिकाण आहे हे मला समजतं, जे लोकांच्या अन्नात भर घालील आणि शेतीमध्ये सुधारणा घडवील. मोठमोठ्या जमिनी सहकारी ग्रामसंस्थेच्या मालकीच्या आहेत आणि पुरेशी नुकसानभरपाई देऊन किंवा इतर मार्गांनी त्यांचे रूपांतर सहकारी शेतीत करता येण्याजोगे आहे. या आणि इतर गोष्टी करायच्या आहेत. पण, गोमंतकात सर्वप्रथम नागरी हक्क हवे आहेत. तुरुंगवासाचे प्रकार पूर्वी घडले आहेत आणि तरीही गोमंतकी आत्मा विविध प्रकारे जिवंत ठेवण्याचा प्रयत्न होत राहिला आहे. जरी संघटित नसले तरी गोव्यात सर्वत्र पुरुषांच्या विविध गटांची कमतरता नाही, जे त्यांना जखडून ठेवणार्‍या गुलामगिरीविरुद्ध धुमसत आहेत. नागरी हक्क सुरक्षित ठेवण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आणि कृतींतून मला विश्वास आहे की एक व्यापक पाया असलेली संघटना उभी राहील, जी आपल्या शाखा आणि संलग्न संस्थांद्वारे पुढील कामं हाती घेईलः

१. गोमंतकीय कॅथलिक, हिंदू आणि इतरांना एका समान हिंदुस्थानी राष्ट्रीयत्वामध्ये जोडून घेणं.
२. भारतीय तिरंग्याचा सन्मान राखणं आणि लोकांना त्यांची राष्ट्रीय गीतं गाण्यास समर्थ करणं.
३. मराठी आणि कोकणीच्या विकासास चालना आणि हिंदुस्थानीला प्रोत्साहन देणं.
४. स्वयंसेवक दलांद्वारे युवकांना सामाजिक आणि सहकारी पद्धतींमध्ये प्रशिक्षण देणं.
५. शेती संरक्षित करणं आणि ग्रामोद्योग व खादीचे पुनरुज्जीवन करणं आणि ग्रामीण कामगारांना त्यासाठी प्रशिक्षित करणं.
६. रेल्वे आणि बंदर कामगारांना संगटित करणं आणि गरीबांची मदत करणं.
७. तांदळाचा काळाबाजार रोखणं.
८. सहकारी शेतीस चालना देणं.

अशा प्रकारची संघटना प्रतिनिधित्व नसलेल्या गोमंतकीयांना स्थानिक सरकारी मंडळांवर निवडून देईल आणि त्यांना बळाने किंवा गैरप्रकारांनी परत पाठवणे अशक्य बनेल.

हेही वाचाः गोवा मुक्तीनंतर गेल्या साठ वर्षांतील वाटचाल

गोमंतक हा हिंदुस्थानचा भाग आहे आणि उर्वरित देशात ज्याप्रमाणे ब्रिटीश सत्ता आहे, तशी पोर्तुगाली सत्ता त्यावर अपघाताने राज्य करीत आहे आणि हे दुःस्वप्न संपणार आहे. हिंदुस्थानचे संयुक्त राष्ट्र येणार आहे. आपले लोक ते घडवीत आहेत. आपण त्याच्या निर्मितीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. आपले नेते आणि ब्रिटीश नेते यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटी केवळ निमित्तमात्र आहेत. आपल्या आशा आणि भय यांचा त्यांच्याशी संबंध नाही. आपली आशा ही आपल्या लोकांची शक्ती आहे, जी वाढत चालली आहे आणि ती राष्ट्रनिर्मिती करील, भले मग तोवर कितीही कारवायांना आपल्याला सामोेरं जावं लागो. दरम्यान, गोव्याच्या जनतेने, मुक्तपणे विचार करावा, मुक्तपणे बोलावं, मुक्तपणे लिहावं आणि संघटित ताकद निर्माण करण्यासाठी वावरावं!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!