‘नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा’

कोविड कालावधीत सकारात्मकता वाढवण्यासाठी आत्मविश्वास असणं महत्त्वाचं

Goan Varta Live | प्रतिनिधी

माणसाने जर पाण्याला स्वतःच्या मुठीत बंद केलं तर काय होईल? पाणी मुठीमध्ये न राहता तात्काळ निसटून जाईल. याचप्रमाणे माणूस स्वतःच्या माणसांबाबत, मुलांबाबत, नातेवाईकांबाबत करत असतो. आम्ही आमच्या स्वतःच्या माणसांना दूर ठेवायला बघत नाही. आम्हाला भीती वाटते की ही आपली माणसं स्वतःपासून दूर जातील, त्यांची साथ सुटेल, किंवा त्यांच्याबाबत काहीतरी वाईट घडेल. म्हणून आम्ही आमच्या माणसांना जवळ ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु वास्तविक याचमुळे आमची माणसं आमच्यापासून दूर होत असतात. त्यामुळे तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता, त्यांना खरं म्हणजे त्यांच्या विचारांना स्वातंत्र्य देऊन मुक्त केलं पाहिजे, जेणेकरून ते आपला मार्ग स्वतःच शोधतील. कारण आपण आपल्या माणसाच्या सोबत प्रत्येक वेळी राहू शकत नाही आणि प्रत्येक वेळी त्यांना मार्गदेखील दाखवू शकत नाही. त्यामुळे आपल्या माणसाला आपण साथ द्यायची हे जरी खरं असलं, तरी आपण कायम साथ देऊ शकत नाही.

सकारात्मकता महत्त्वाची

जन्मानंतर जेव्हा बालकांचे डोळे उघडतात तेव्हा ते उत्सुकतेने भरलेले असतात जीवनाचा नवा आरंभ पाहण्यासाठी. हळूहळू बालक मोठं व्हायला लागतं आणि त्याची जीवनाविषयीची उत्सुकता वाढते. आम्ही जेव्हा सकाळी उठतो आणि डोळे उघडतो, तेव्हा डोळे उघडल्यानंतर जे दिसतं त्यालाच आपण आपला प्रारंभ समजला तर? सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण आपल्या जीवनाकडे उत्सुकतेने, सकारात्मकतेने पाहिलं, तर आपल्या जीवनात कितीतरी प्रकारे स्फूर्ती येते, काम करण्याची ऊर्जा निर्माण होते. आपल्या जीवनाचा हरेक क्षण, प्रत्येक वेळ उत्सुकतेने भारावून जातो.

विश्वास नव्हे, तर आत्मविश्वास हवा

वास्तविक मनुष्य आपलं जीवन विश्वासावर जगत असतो. पण विश्वास कोणाचा? विचार करा? कोणावर विश्वास आहे आपला? आई-वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीवर? साधू-संतांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानावर? गुरुजनांनी दिलेल्या शिकवणीवर? विविध धार्मिक ग्रंथांवर? किंवा ईश्वराच्या गोष्टीवर? कशावर? हा सर्व विश्वास अपूर्ण आहे तोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास नाही. जर विश्वास करायचा असेल, तर अविश्वास निर्माण करणारं विज्ञानही जाणता आलं पाहिजे. तुम्ही कुणाच्याही गोष्टींवर विश्वास करू नका. तुम्ही तुमच्या मनाला, अंतरात्म्याला विचारा. तुम्हाला उत्तर मिळेल. आणि तेच उचित असेल. एकलव्याला गुरुवर्य द्रोणाचार्यांनी धनुर्विद्या शिकविण्यास नकार दिला. म्हणून एकलव्य हरला नाही. तर त्याने स्वतःवर विश्वास ठेवला. गुरुवर्य द्रोणाचार्यांचा पुतळा तयार केला आणि विद्या ग्रहण केली. केवळ स्वतःवर विश्वास होता म्हणून. तुम्ही जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवता, तेव्हा तुमच्या अंतरातून आपोआप ज्ञानगंगा व्हायला लागते आणि तुमच्यात सकारात्मकता येते. आणि म्हणून विश्वास ठेवा, कोरोनाचे कितीही भयानक संकट जरी आलं, तरी यातून आपण सर्वजण नक्की बरे होणार आहोत…

  • अ‍ॅड. शिवाजी देसाई
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!