माणसाला माणसाशी जोडणारा सण

गोव्यात संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत महिलांमध्ये प्रचंड उत्साह आणि उमेद पाहायला मिळते.

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः नवीन वर्षा स्वागतोत्सव साजरा झाला की , वेध लागतात ते वर्षातील पहिल्या सणाचे, मकर संक्रांतीचे. खाण्याच्या विविध पदार्थांचा आस्वाद, आप्तेष्टांची भेट, हळदी कुंकवाच्या निमित्ताने शेजार्‍यांची भेट, लहान मुलांना बोरन्हाणं, पतंगोत्सव अशा सर्व प्रकारे आनंद देणारा सण म्हणून संक्रांतीकडे पाहिलं जातं. या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला ‘संक्रांत’ असं म्हणतात. या दिवशी सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला ‘मकर संक्रांत’ म्हणतात. याचसोबत मकरसंक्रमणाचा दिवस विशेष पुण्यप्रद मानला जातो. या वेळी देशात विविध ठिकाणी पूजा अर्चा, विशेष गंगास्नान, दान धर्म कले जातो. गोव्यात संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत महिलांमध्ये प्रचंड उत्साह आणि उमेद पाहायला मिळते. संक्रांतीचा हा सण गोव्यात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

दक्षिणायन-उत्तरायण

आपण जर दररोज सूर्याच्या उगवण्याच्या किंवा मावळण्याच्या जागेचं निरीक्षण केलं, तर सूर्याची बदललेली जागा लक्षात येईल. ज्यावेळेस पृथ्वीची उत्तर ध्रृवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते, तेव्हा सूर्य जास्तीत जास्त उत्तरेला सरकलेला असतो. 21 मार्च ते 21 जूनपर्यंत सूर्य उत्तरेला सरकतो. यालाच ‘उत्तरायण’ असं म्हणतात. तर 22 सप्टेंबर ते 22 डिसेंबरपर्यंत सूर्य दक्षिण दिशेला सरकतो. यालाच ‘दक्षिणायन’ असं म्हणतात. तर 22 मार्च आणि 22 सप्टेंबर या दोन दिवशी सूर्य बरोबर पूर्व दिशेला उगवतो. या दोन तारखांना ‘विषुवदिन’ असं म्हणतात. या दिवशी दिवस-रात्र समान बारा-बारा तासांचे असतात. मकर संक्रांतच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. 21-22 डिसेंबरला सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. अर्थातचं त्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरूच असतं. पृथ्वीवरुन पाहिलं असता 21-22 डिसेंबरपासून सूर्योदयाचं स्थान दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकतं. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा या राशीला ‘मकर संक्रांत’ म्हणतात. या दिवशी सूर्य धनू राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते. पृथ्वीची जी बाजू सूर्याच्या जवळ असते तिथे उन्हाळा असतो. तर जी बाजू दूर असते तिथे हिवाळा असतो. कमी-जास्त तापमानामुळे ऋतू होतात.

सुगड पुजनाला महत्व

संक्रातीच्या दिवशी गोव्यात ‘सुघट’ म्हणजे ‘सुगड’ पुजनाला महत्व आहे. सुगड पुजन केल्याशिवाय स्त्रिया हळदीकुंकू करत नाहीत. सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून केली जाते. पाटाभोवती छान रांगोळी काढली जाते. पाटावर लाल रंगाचं वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवले जातात. आणि मगच त्यावर सुगड मांडलं जातं . सुगड पुजन करण्याअगोदर त्याला हळद – कुंकू ओलं करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवलं जातं. हरभरा, गाजर, उस, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गहू हे सर्व साहित्य सुगडात घातलं जातं. सुगडावर अक्षता, फुलं, हळद, कुंकू वाहून मनोभावे नमस्कार केला जातो. तिळाच्या लाडवांचां नैवेद्य सुगडाला दाखवला जातो.

का साजरी करतात संक्रात?

संक्रातीनंतर रथसप्तमीपर्यंत गोव्यातील घराघरा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. या निमित्ताने तिळगुळाची चव चाखत एकमेकांच्या घरी जाऊन, आपला स्नेह व्यक्त करण्याची पद्धत पूर्वीपेक्षा सुद्धा अधिक वेगाने चालू असलेली दिसतेय. संक्रांतीच्या दिवसात सर्वांगाला गारठवून टाकणारी थंडी पूर्वी असायची. वैश्‍विक तापमानामुळे संपूर्ण वातावरणात होत असलेल्या बदलाला सामोरं जातं, जे काही चांगलं आहे ते स्वीकारायचं व वाईट आणि विरोधी आहे ते सोडून द्यायचं. म्हणून मकर सक्रांत साजरी करण्याला महत्व आहे.

एकमेकांशी जोडणारा सण

आज जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आज माणसं खूप मोठ्या प्रमाणात एकमेकांशी जोडली गेली आहेत. फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इंटरनेटसारख्या माध्यमांतून प्रदेशाचं, देशाअंतर्गत अंतर कमी झालंय. संदेश देण्याघेण्याचं काम खूप वेगानं घडतंय. त्याचबरोबर दुसरीकडे जीवंत संवाद हरवत चाललाय. घरातील आपल्या माणसांशी चार घटका निवांतपणे बोलण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. मोबाईलवर मात्र तासन्‌ तास बोलण्यात आपण वेळ घालवतोय. या पार्श्‍वभूमीवर मकर संक्रांतीचा सारख्या सणाच्या निमित्ताने आपण चार चौघात जातो, त्यांच्याशी जोडले जातो, चार सुख-दुःखाच्या गोष्टींची देवाणघेवणा होते. थोडक्यात काय, आज मकर संक्रातीसारख्या सणांची आपल्याला गरज आहे. तंत्रज्ञानाच्या काळात आज माणसाला माणसाशी जोडण्याचं काम मकर संक्रातीसारखे सण करतात.

भेटी-गाठीचा सण गुरफटतोय प्रतिष्ठेच्या वलयात

पूर्वी उंबरठ्याबाहेर महिलांना पडताच येत नव्हतं. परंतु हळदी-कुंकवाच्या निमित्ताने एकमेकींच्या घरी जाता यायचं. सुखदुःखाचा संवाद साधला जायचा. त्यामुळे मन हलकं व्हायचं. आज मनमोकळं बोलण्यासाठीची साधनं खूप आहेत. त्यामुळेच की काय हा सण प्रतिष्ठेच्या वलयात गुरफटला गेलेला दिसतोय. हळद-कुंकवाच्या सोबतीने एकमेकींना भेटी देण्यासाठीच्या ‘वायन किंवा वाण’रुपी भेटवस्तूची चलती झालीये. प्रत्येक स्त्री स्वतःच्या ऐपतीनुसार जरी यात सहभागी होत असली, तरी आपापसातील स्पर्धा वाढीस लागलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!