एकेकाळचा बलाढ्य विंडीज संघ विश्वचषकातून बाहेर ? जाणून घेऊयात त्यांच्या अधःपतनाची कारणे !

ऋषभ | प्रतिनिधी
वेबडेस्क 2 जुलै : 2016चा तो दिवस नाही वाटत कुणी क्रिकेटवेडा चाहता एवढ्यात विसरू शकेल. बेन स्टॉक्सच्या शेवटच्या षटकात सलग 4 षटकार मारून विंडीजला 2दा T20 विश्वचषकाचा विजेता बनवणाऱ्या कार्लोस ब्रेथवेट विषयी कॉमेंट्री बॉक्स मधून इयोन बिशपचे ते गौरवोद्गार ” CARLOS BREATHWAIT, DOWN THE LINE…..REMEMBER THE NAME” परवा दिवशी आठवले आणि जरा मनाचा जास्तच ठाव घेऊन गेले. ‘अर्श से फर्श तक’ का सफर की काय म्हणतात ते हेच का? असाही प्रश्न पडला. नेदरलँडने एव्हाना त्या मॅच मध्ये विंडीजला चांगलेच घुसळून काडले होते. सुपर ओव्हर सुरू झाली त्यात चक्क होल्डर गोलंदाजी करायला आला, का आला? त्याचे त्याला माहीत ! वान बिक ने पुढील 6 चेंडूत असलेला नसलेला सगळा अनुभव पणास लाऊन होल्डरचा बल्ब ढिला केला आणि तब्बल 30 रन्स वसूल केले. प्रतिउत्तर देताना विंडीजने पहिल्या चेंडूवर षटकार मारला खरा पण पुढील 4 चेंडूत त्यांच्या 2 दांडक्या वान बिकनेच उडवल्या आणि विंडीज पराभूत झाला. हे सगळे कार्लोस ब्रेथवेट कॉमेंटरी बॉक्समध्ये फक्त बसून पाहत होता. फक्त कीव करावीशी वाट होती ही दृश्ये पाहताना.

आता हे सगळे पुराण लिहीपर्यन्त वेस्ट इंडीजचा संघ विश्वचषकाच्या क्वालिफायर २०२३ स्पर्धेमधून स्कॉटलंड कडून सपाटुन मार खात बाहेर पडला आहे. क्रिकेट जगतासाठी यापेक्षा आश्चर्यकारक बातमी सद्यघडिस कुठलीच नाही.एके काळचा बलाढ्य वेस्ट इंडिजचा संघ ज्याने जवळपास तीन-चार दशके जागतिक क्रिकेटवर राज्य केले. तोच संघ आज नवख्या संघांसमोर उठाबशा काढतोय ही पाहताना खूप त्रास होतो. हाच तो बलाढ्य वेस्ट इंडिज संघ ज्याने पहिले दोन क्रिकेट विश्वचषक जिंकले. प्रथम 1975 मध्ये आणि पुन्हा 1979 मध्ये. 1983 च्या विश्वचषकातही त्यांनी अंतिम फेरी गाठली होती. पण कॅरेबियन संघाने केवळ एकदिवसीय विश्वचषकावरच वर्चस्व गाजवलेले नाही. त्याने दोनदा टी-20 विश्वचषकही जिंकला आहे. वर्ल्डकपचा विचार केला तर ऑस्ट्रेलियानंतर सर्वात यशस्वी संघात दुसरे नाव वेस्ट इंडिजचे येते.

पण जागतिक क्रिकेटविश्व एकंदरीत बेस्ट क्रिकेटकडे प्रवास करत असताना कॅरेबियन क्रिकेट कसे आणि कुठे मागे राहिले? या प्रश्नांची उत्तरे लवकर न मिळाल्यास जागतिक क्रिकेटचे मोठे नुकसान होणार आहे. हे केवळ वेस्ट इंडिजच्या गौरवशाली इतिहासाबद्दल नाही. क्रिकेटबद्दलही आहे.क्रिकेटचा उदय आणि विंडीजचा उदय ही दोन्ही समांतर विषय आहेत. क्रिकेट चालणार हे खरे आहे पण विंडीज का मागे पडतेय ? दर काही वर्षांनी नवीन संघ येतील आणि आपला इतिहास घडवतील. पण वेस्ट इंडिजशिवाय विश्वचषकासारख्या स्पर्धेची कल्पना करणे कठीण आहे. मात्र ही कल्पना आता कल्पनामात्र राहिली नसून ते प्रखर वास्तव बनून चाहत्यांच्या मनात चिंतेचा विस्तव जाळत आहे. आणि या विस्तावाची धग पूर्ण क्रिकेटविश्वाला या वर्षी ५ ऑक्टोबरपासून होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषकात नक्कीच जाणवेल.
1960,1970 आणि 1980 चे दशक हे वेस्ट इंडिज क्रिकेटचे सुवर्णकाळ म्हणून पाहिले जाते, याच काळात क्रिकेटचा सर्वांगीण विकास झाला तर 1990 चे दशक त्याच्या अधोगतीची साक्ष देते. त्यातल्या त्यात दुसरी बाजू अशी की हाच अमर्याद विकास, मग तो रेव्हेन्यूच्या माध्यमातून असो किंवा मग T20 / T10 फ्रेंचाईस क्रिकेटच्या माध्यमातला विकास असो तो विंडीजच्या एक क्रिकेटसंघ म्हणून असलेल्या प्रवासास मारकच ठरला आहे. पहिल्या 3 विश्वचषकात ज्या संघाला सामोरे जाण्यास प्रतिस्पर्धी संघ घाबरायचे. त्यानंतरच्या 9 विश्वचषकांमध्ये त्यास एकदाही अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल ना ? आणि आता तर दिवस एवढे फिरलेत की चक्क वर्ल्ड कपमधून त्यांचे पॅकअप झालेय.

एकंदरीत विंडीज संघाच्या या दुरावस्थेची 2 प्रमुख कारणे सांगता येतील.
1) संघ निवडीतील अक्षम्य चुका
2000 च्या दशकाच्या सुरवातीपासूनच वेस्ट इंडिज क्रिकेटबद्दल असे म्हटले जात आहे की त्याचे बोर्ड खेळाडूंचे व्यवस्थापन करण्यास सक्षम नाही. खेळाडूंच्या निवडीत भेदभाव केल्याची चर्चा अनेकदा होते. कोणत्याही क्रिकेटपटूने अधिक सुविधा किंवा पैशांची मागणी केली तर त्याला संघाबाहेर फेकले जायचे अजूनही होतेच आहे. ही कुणीही मान्य करेल की जेसन होल्डर आणि त्यापूर्वी डेरेन सामी सारखा सुमार दर्जाच्या खेळाडुंना फक्त याच साठी संघात स्थान दिले असावे कारण ते बोर्डाच्या मर्जीबाहेर नाहीत. तसेच बोर्डाच्या संघातील स्टार क्रिकेटपटूंनी केवळ निवड समिती किंवा कोणत्याही मोठ्या खेळाडूविरोधात वक्तव्य केल्याने त्यांना संघात स्थान दिले जात नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. यापूर्वी एकाच खेळाडूसोबत (केरोन पोलार्ड) असे घडले होते. मग ते संपूर्ण ग्रुपसोबत घडू लागले. त्यामुळे स्टार क्रिकेटपटूही आपल्या संघाशी पूर्वी इतके निष्ठावान राहिले नाहीत. ख्रिस गेल, केरोन पोलार्ड,आंद्रे रसेल, द्वेन ब्रावो, सुनील नरेन सारखे अनेक प्रतिभावान खेळाडू बोर्डाशी फारकत घेत जागतिक क्रिकेटविश्वात कमाल करीत आहेत.

2) अनुभवी खेळाडूंची कमतरता भरून काढण्यास अपयश
खेळ किंवा संघ कोणताही असो, त्याला नेहमी त्याच्या भविष्याची तयारी करावी लागते. दूरदृष्टीनुसार निर्णय घ्यावे लागतात. याच गोष्टीची वानवा वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये दिसून आली. तिथले देशांतर्गत क्रिकेट सतत कमकुवत होत गेले. त्याचे परिणामही समोर येत राहिले. जसे भारतात सचिन, गांगुली, सहवागची योग्य रिपलेसमेंट वेळीच शोधली गेली त्याच प्रमाणात ऑस्ट्रेलियातही रिकी पोंटिंग, मेथ्यु हेडन, शेन वॉटसन, ब्रेट ली यांची रिपलेसमेंट शोधली गेली. आणि ज्यांना ती शोधता आलेली नाही ते दक्षिण आफ्रिका, श्रीलंका विंडीज सारखे संघ आपली चमक घालवून बसले. यास कारणीभूत स्वतः त्याचे क्रिकेट बोर्डच आहेत.

आणि 3रे कारण जे एव्हाना सर्वश्रुत आहे टेस्ट किंवा एकदिवसीय सांमन्यांना महत्व न देता जगभर उड्डाणे घेत फ्रेंचाईस क्रिकेट खेळणे. मग कुठला होतोय संघाचा विकास आणि प्रगती. मग जे काही शिल्लक अर्धे कच्चे खेळाडू असतात त्यांनाच उभे करून संघ उभारायचा आणि क्रिकेटच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या संघाकडूनही शिकस्त झेलायची या व्यतिरिक्त पर्याय नाही उरत.
आता आपण अश्याच काही मोजक्या सामन्यांच्या नोंदी पाहणार आहोत ज्यात तुलनेने कुमकुवत संघाने अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी करत बलाढ्य संघास धूळ चारलीये !
1) आयर्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज (नेल्सन, 2015)
आयर्लंडने त्यांच्या 2015मधील विश्वचषकाची सुरवात विंडीज वरच सनसनाटी विजय मिळवत केली. पण तत्कालीन कर्णधार व्हीलयम पोर्टरफील्डच्या मते हा ‘अपसेट’ नव्हता तर चांगला क्रिकेट खेळणारा देशच विजयी ठरला होता.
प्रथम फलंदाजी करीत वेस्ट इंडिजने 5 बाद 87 धावसंख्येवरून 7 बाद 304 अशी धावसंख्या उभारली, लेंडल सिमन्सने शतकासह आपल्या संघास एक सन्मानजनक टार्गेट सेट करण्यास मदत केली.

पॉल स्टर्लिंग (92) आणि एड जॉयस (84) यांनी धावांचा पाठलाग करताना निल ओब्रायनच्या नाबाद 79 धावांच्या बळावर आयर्लंडला 25 चेंडू बाकी असताना आश्चर्यकारक लक्ष्य गाठण्यास मदत केली
2) झिम्बाब्वे विरुद्ध इंग्लंड (अल्बरी, 1992)
झिम्बाब्वेने 1992 मध्ये (तब्बल नऊ वर्षांच्या अवकशानंतर) क्रिकेट विश्वचषकातील फक्त दुसरा विजय नोंदवला, ऑस्ट्रेलियाच्या अल्बरी येथे कमी धावसंख्येच्या सामन्यात इंग्लंडला चिवटरीत्या संघर्ष करत पराभूत केले.
बॉलर फ्रेंडली पिचवर झिम्बाब्वे चांगलीच धडपडली, कसे बसे 134 रन्स काढत 47 व्या षटकात ऑल आऊट झाले. रिचर्ड इलिंगवर्थ आणि फिल टफनेल या इंग्लंडच्या फिरकी जोडीने त्यांच्यात पाच विकेट्स घेतल्या.

आता झिम्बाब्वेकडे तसे पाहता गमावण्यासारखे असे काही नव्हतेच, त्यानीही जीव तोडून गोलंदाजी केली आणि ग्रहम गूचची पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. पुढे इंग्लंडने 5 विकेट गमावून कसे बसे 95 धावा बोर्डवर लावल्या खऱ्या पान पुढील 30 धावांत त्यांच्या संघाने सपशेल लोटांगण घातले. अशापद्धतीने झिम्बाब्वे विश्वचषकातील आपल्या सगळ 18 पराभवांची मालिका खंडित करण्यात यशस्वी ठरला.
3) बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान (नॉर्थम्प्टन, 1999)
1999 मध्ये बलाढ्य पाकिस्तानचा पराभव केला त्यावेळी बांगलादेशला अद्याप पूर्ण कसोटी दर्जाही मिळालेला नव्हता. हा सामना एक डेड रबर असताना, पाकिस्तानने उपांत्य फेरीसाठी आधीच पात्र ठरण्याची खात्री केली होती.
इंग्लंडमधील नॉर्थॅम्प्टन येथील काउंटी ग्राउंडवर फलंदाजी करताना त्यांनी 50 षटकांत 9 बाद 223 धावा केल्या. पाकिस्तान संघर्ष करणार आहे हे लवकरच स्पष्ट झाले.

त्यांनी त्यांचे पहिले पाच विकेट केवळ 42 धावांत गमावले,सईद अन्वर लवकरच धावबाद झाला आणि बघता बघता पाकिस्तानचा डाव 44.3 षटकांत 161 धावांवर संपुष्टात आला.
4) बांगलादेश विरुद्ध भारत (त्रिनिदाद, 2007)
हा सामना विसरणे बापजन्मांत शक्य नाही. 2007 क्रिकेट विश्वचषकाच्या फॉरमॅटने सर्व संघांना बांधून ठेवले होते. सर्वांना वाटले की लिंबू टिंबू संघ आधीच खपतील आणि बलाढ्य संघच तेवढे पुढील फेरीत पात्र ठरतील. पण या लिंबू टिंबू संघांनी असे काही लिंबू फिरवले की भारत-पाकिस्तान सारखे संघ चक्क श्रीलंका-बांग्लादेश / झिम्बाब्वे-आयर्लंड कडून पराभूत झाले.
ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि बर्म्युडा यांच्याबरोबर भारताला काळजी करण्याची फारशी गरज नव्हती. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताचा डाव 191 धावांवर संपुष्टात आला होता, जरी सौरव गांगुलीने 66 धावा केल्या नसत्या तर त्यांची अंतिम धावसंख्या आणखी कमी झाली असती.

मुशफिकुर रहीमने नाबाद 56 धावांसह उत्कृष्ट परिपक्वता दर्शविल्याने बांगलादेशने पाच विकेट्स शिल्लक विजय पटकावला. पहिल्या फेरीतच स्पर्धेतून बाहेर फेकले गेल्यामुळे भारताला हा पराभव महागात पडला.
5) आयर्लंड विरुद्ध पाकिस्तान (जमैका, 2007)
2007 मधील सेंट पॅट्रिक्स डे आयर्लंडच्या क्रिकेट संघासाठी विशेषतः खास होता, कारण त्यांनी जमैकामधील सबिना पार्कमध्ये पाकिस्तानला चकित केले होते.

खेळपट्टीवर पाकिस्तानचा डाव 45.4 षटकांत 132 धावांत गुंडाळला गेला. नील ओब्रायनच्या संयमशील फलंदाजीने आणि केविन ओब्रायन, कर्णधार ट्रेंट जॉन्स्टनच्या साथीने आयर्लंडला तीन गडी राखून विजय मीळवता आला. अशा रीतीने आशिया खंडातील दोन्ही बलाढ्य संघ घरी परतले.
यंदाचा विश्वचषक भारतात होणार आहे आणि 83च्या विश्वचषकाच्या विजयास 40 वर्षे पूर्ण होतायत. आणि त्यात विंडीजचा संघ नसणे म्हणजे जरा विचित्र वाटतेय. 25 जून 1983 रोजी, कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने लंडनमधील लॉर्ड्स येथे एका रोमांचक फायनलमध्ये बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव केला प्रथमच वर्ल्ड चॅम्पियन बनले.

हा विजय स्वप्नातित होता आणि त्याकडे केवळ खेळातील विजय म्हणून पाहणे ही त्या विजयाची अव्हेलना केल्यासारखे होईल .अनेक भारतीयांमध्ये विश्वास निर्माण झाला की भारतीय केवळ जगाशी स्पर्धाच करू शकत नाहीत तर जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू देखील होऊ शकतात. त्यांनी गतविजेत्या वेस्ट इंडिजचा पराभव केल्याने दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रासाठी त्या विजयाचा अर्थ काय होता हे जेव्हा आज आपण भारतीय क्रिकेटची प्रगती पाहून ठरवू शकतो.

भारताने 1983 विश्वचषक स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रथम फलंदाजी करत फक्त 183 धावा केल्या होत्या, जो काही मोठा असा स्कोर नव्हता. तथापि, त्यांनी त्या स्कोअरच्या बचावासाठी अप्रतिम लढा दिला आणि कदाचित हा एक शब्द आहे जो सुमारे 40 वर्षांपूर्वी त्यांची मोहीम काय होती हे परिभाषित करण्याच्या दृष्टीने एकदम चपखल बसतो ! लढा. ग्रिट आणि हार न मानता कार्य सिद्धीस नेणे.

धावांचा पाठलाग करताना, वेस्ट इंडीजने गॉर्डन ग्रीनिजची विकेट लवकर गमावली होती परंतु डेसमंड हेन्स आणि विशेषतः नंतरचे व्हिव्ह रिचर्ड्स उत्कृष्ट फोर्म मध्ये दिसत होते, आणि 117 पेक्षा जास्तच्या सरासरीने धावसंख्येचा पाठलाग करताना भारतापासून खेळ काढून घेण्याचा प्रयत्न करत होते. 60 षटकांत 183 धावा काही मोठी गोष्ट नव्हती पण दोन्ही फलंदाज झटपट बाद झाले आणि दोन्ही विकेट्स मदन लाल यांनी घेतल्या. रिचर्ड्सला बाद करण्यासाठी कपिल देवने मागे पळत जात टिपलेला तो झेल मागच्या पिढीतले कधीच विसरणार नाहीत.

माना अथवा नका मानू पण मला ठामरित्या वाटतं की विंडीजच्या खऱ्या अधोगतीची सुरवात ही कपिलदेवच्या त्या कॅचने आणि भारताच्या क्रिकेटविश्वावरील उदयाने झाली असावी.